‘त्या’ भूपाळीने नागपूर जिल्ह्यातले उमरेड हरखून जायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:34 AM2017-11-18T11:34:33+5:302017-11-18T11:40:28+5:30
‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न उमरेडकरांच्यासमोर उभा ठाकला आहे.
अभय लांजेवार ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ‘मलयगिरीचा चंदन गंधीत, धूप तुला दाविला... स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाळा...’ कुमार गंधर्व यांच्या सुरेल, आवाजाच्या जादुई भूपाळीने त्या काळात चांगलीच मोहिनी घातली होती. उमरेडकरांचीही पहाट याच भूपाळीने होत असे. मंगळवारीपेठ येथील गुरुदेव सेवाश्रमाच्या भव्य परिसरातील उंच झाडाला ‘भोंगा’ बांधला होता. अगदी पहाटे ४ वाजताच या भोंग्यातून ‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. उमरेडच्या कानाकोपऱ्यात ही भूपाळी जेव्हा पोहचायची तेव्हा रस्त्यारस्त्यावर सडासंमार्जन करून आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या जायच्या. ‘त्या’ आनंदी क्षणांचे आजही अनेकजण साक्षीदार आहेत.
दंग सदावर्ती, बालाजी चौधरी, सुखदेव किन्नाके, लक्ष्मण तारणेकर, वामन मुडपल्लीवार आणि मनोहर सदावर्ती यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंतांनी स्वत: उमरेड शहरात ‘गुरुदेव सेवाश्रम’ सुरू केला. होळकर गुरुजींचा हा शानदार वाडा पूर्वी ‘देवराज आश्रम’ म्हणून ओळखला जायचा. रोज सकाळी ध्यान आणि सायंकाळी सामूहिक प्रार्थनेसाठी लोकं येथे गोळा होऊ लागले. आजही नित्यनेमाने याठिकाणी ध्यान आणि प्रार्थना सुरूच आहे. केवळ माणसांची संख्या तेवढी रोडावली.
अडगळीच्या एका खोलीत सध्या ध्यान आणि प्रार्थना होत असते. शिवाय, आताही मोठ्या झाडाला भोंगा अडकवलेला दिसतो. भोंगा वाजविणारे साहित्यही आहे. परंतु, ते निकामी झाले आहे. पुनश्च ‘उठी उठी गोपाळा’चे ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न त्यांच्या अनुयायांसमोर उभा ठाकला आहे.
राष्ट्रसंतांचा सेवाश्रमातच मुक्काम
सन १९५७ नंतर राष्ट्रसंत जेव्हा या परिसरात कीर्तनासाठी येत असत, त्यावेळी ते या सेवाश्रमात मुक्कामी असायचे. सोबतच त्यावेळेस दहा ते बारा वेळा तुकडोजी महाराजांच्या कीर्तनाचा लाभ उमरेडकरांना मिळाला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या ‘शेतकरी’ या गंभीर विषयावर ‘त्या’ काळात (आज कुणीच बोलत नाही) महाराज पोटतिडकीने बोलत, जनजागृती करत. दारूबंदी, ग्रामस्वच्छता, विज्ञान, अध्यात्म, देशसेवा असे सर्वसमावेशक विषय ते हाताळत. ‘माणूस’ हा त्यांच्या कीर्तनाचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या सामाजिक प्रबोधनपर कीर्तनाचा ‘रंगच न्यारा’ अशा जुन्या तेवढ्याच ताज्या आठवणी नामदेव राऊत, पंजाबराव आंभोरे मोठ्या उत्सुकतेने आजही व्यक्त करतात.
पूर्णाकृती पुतळा
११ आॅक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंतांच्या निधनाची वार्ता या परिसरात जेव्हा पोहचली तेव्हा सारेच हळहळले. त्यांच्या अंत्यविधीसाठी दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचे असल्याने अनेकांनी रात्र जागून काढल्याचे दादाभाऊ नक्षिणे यांनी सांगितले. कालांतराने या सेवाश्रम परिसरात माजी मंत्री डॉ. श्रावण पराते, नामदेव राऊत, पंजाबराव आंभोरे यांच्या पुढाकारातून महाराजांचा पूर्णाकृती पुतळा साकारला गेला. अवतीभवती उंच वृक्षवल्लींमुळे हा परिसर अधिकच नयनरम्य झाला. या परिसराचा ‘विकास’ झाला पाहिजे आणि अधिकांश लोकांनी याकामी पुढाकार घ्यायला हवा, असा विचारप्रवाह पुढे येत आहे.