ट्रामा सेंटरमध्ये हा कसला ‘ड्रामा’? लोकार्पण सोहळा आटोपताच लागले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 11:20 AM2022-01-06T11:20:52+5:302022-01-06T12:00:38+5:30
रविवारी उमरेड ट्रामा केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा गाजावाजा करत साजरा करण्यात आला. अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असताना आता या ट्रामा सेंटरला कुलूप लागले आहे.
अभय लांजेवार
नागपूर :आरोग्याच्या सोयी-सुविधांबाबत आधीच गोरगरीब-सर्वसामान्यांचे हाल-बेहाल आहेत. अशातच रविवारी उमरेड ट्रामा केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा गाजावाजा करत साजरा करण्यात आला. अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असताना आता या ट्रामा सेंटरला कुलूप लागले आहे. कुलूपच लावायचे होते तर ग्रामीण रुग्णालयाने लोकार्पण सोहळा का बर घेतला, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
सप्टेंबर २०२० मध्ये ३ कोटी २४ लाख रुपयांच्या ट्रामा सेंटरच्या कामाचे भूमिपूजन झाले. इमारत बांधकाम आणि अन्य कामे धडाक्यात पूर्णत्वास आले. ट्रामा केअर सेंटर सुरू होणार असल्याने उमरेड विभागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार होती. अपघाताच्या गंभीर रुग्णांवरही तातडीने वेळीच उपचाराची सुविधा ट्रामा सेंटरमध्ये असते. ऑर्थोपेडिक डॉक्टरांसह संपूर्ण चमू याठिकाणी असावी लागते.
शिवाय अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधासुद्धा ट्रामा सेंटरमध्ये मिळते. ३० ते ४० बेडच्या या ट्रामा सेंटरमध्ये लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर लोकसेवेसाठी सदर सेंटर अर्पण व्हावयास पाहिजे होते. यामुळे हकनाक बळी जाणाऱ्यांचे प्राण वाचविण्याचे भाग्य लाभले असते.
दुसरीकडे लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर या सेंटरला कुलूप लावल्याने अनेक प्रश्न विचारल्या जात आहेत. याठिकाणी आरोग्य सेवाच सुरू करायची नव्हती तर मग ट्रामा सेंटर सुरू करण्याचा ड्रामा केला तरी कशाला, असा सवाल जनमानसांत विचारला जात आहे. विविध चर्चेला ऊत आला असून तातडीने ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
हस्तांतरणाची प्रक्रिया अपूर्ण
सार्वजनिक बांधकाम विभागाने ट्रामा केअर सेंटरची इमारत आणि अन्य कामे पूर्ण केली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी. आर. ताकसांडे यांच्याशी चर्चा केली असता, करारनाम्यात ज्या कामांचा समावेश होता त्या संपूर्ण कामांशिवाय अतिरिक्त कामेसुद्धा आम्ही केली. ग्रामीण रुग्णालयास ताबा पावती सुपुर्द केली, अशी बाब सांगितली. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ ताबा पावती दिली असली तरी हस्तांतरणाची उर्वरित प्रक्रिया अपूर्णच आहे. त्यामुळे हस्तांतरण न झालेल्या या ट्रामा सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडला, अशीही बाब बोलली जात आहे.
वैद्यकीय चमू कधी येणार?
उमरेड ग्रामीण रुग्णालयाने सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, उपकरणे आणि अन्य साहित्याची यादी जिल्हा आरोग्य विभागाकडे सुपुर्द केली आहे. याबाबतची अद्याप मंजुरीच न मिळाल्याने ट्रामा सेंरटचा मार्ग कठीण झाला आहे. आता सेंटरचे लोकार्पण झाल्यानंतर वैद्यकीय चमू कधी येणार, असा सवाल विचारला जात आहे.
हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू. ट्रामा केअर सेंटरसाठी लागणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मंजुरीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाली की लगेच ट्रामा केअर सेंटरची सुविधा सुरू करणार आहोत.
डॉ. एस. एम. खानम, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, उमरेड