टायर कारखान्याच्या विषारी धुरामुळे उमरेडकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:18+5:302021-08-24T04:12:18+5:30
उमरेड : टायर जाळून मोठ्या प्रमाणावर कार्बनच्या विषारी धुरामुळे शहरामधील नवीन परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही वर्षांपासून ...
उमरेड : टायर जाळून मोठ्या प्रमाणावर कार्बनच्या विषारी धुरामुळे शहरामधील नवीन परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही वर्षांपासून ही समस्या नागरिकांना भेडसावत असून, शासन-प्रशासन झोपेत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. रविवारी मध्यरात्री विषारी धुराचे प्रमाण अधिक दिसून आल्याने शहरातील तरुणांनी एमआयडीसी गाठत कारखान्याचे काम बंद पाडले.
उमरेड एमआयडीसी परिसरात टायरपासून तेलनिर्मिती करणारे चार वेगवेगळे कारखाने आहेत. एमआयडीसी परिसरातील या कंपन्या रात्री ९ वाजताच्या सुमारास भट्टीमध्ये टायर जाळतात. पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत सातत्याने टायर जाळण्याचे काम केले जाते.
यादरम्यान विषारी धूर लगतच्याच धुरखेडा गावातील तसेच उमरेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकाच्या पलीकडील नवीन भागातील रहिवाशांसाठी फारच त्रासदायक ठरत आहे. यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. वारंवार तक्रारीनंतरही काही दिवसातच कारखान्याचे काम पूर्ववत सुरू केले जाते. नियमावलीचे पालन न करणाऱ्या या कंपनीच्या उत्पादनाचे काम बंद करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. प्रदूषण महामंडळाने या समस्येची दखल घ्यावी आणि कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
व्हिडीओ शुटींग आणि धंदा (---बॉक्स---)
मागील अनेक वर्षांपासून ही समस्या डोके वर काढत आहे. नागरिकांची तक्रार झाली की, व्हिडीओ शुटींग केली जाते. तक्रारींचा पाढा वाचला जातो. काही दिवस तेल काढण्याचे काम बंद होते. शुटींगवर बोट ठेवत काही भामटे कंपन्यांकडे व्हिडीओचे चित्रीकरण दाखवितात. कालांतराने मामला थंडबस्त्यात अडकतो. काही दिवसात पुन्हा टायर कंपनीचा असह्य धूर सुरू होतो, अशीही बाब चर्चेत आहे. नियमबाह्य पद्धतीने काम चालविणाऱ्या या कंपन्यांनी चिमणी लावण्याचे आणि नियमांचे पालन करण्याच्या कामाकडेच विशेष लक्ष केंद्रित केले असते तर आतापर्यंत विषारी धुराची ही समस्या कायमस्वरूपी सुटली असती, असेही बोलले जात आहे.
--
तरुणांचा पुढाकार
कारखान्यातील विषारी धुरामुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता, तरुणांनी पुढाकार घेत उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्याकडे निवेदन सादर करीत कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. केतन रेवतकर आणि रितेश राऊत यांच्या नेतृत्वात सुरेश वाघमारे, गुणवंत मांढरे, राकेश नौकरकर, कुणाल मुळे, अमित लाडेकर, प्रफुल बानकर, रोशन झोडे, निखिल काटवले, नेल्सन गजभिये, अजय डावे तसेच रोहित पारवे आणि सतीश चौधरी यांच्या नेतृत्वात तुषार ढोरे, रुमीित राहाटे, कैलास ठाकरे, जितू गिरसावळे, अमोल रायपूरकर, मोनल डाहाके, स्वप्निल चौधरी, सौरभ पाल, सागर दांडेकर, स्वप्निल फटिंग आदींनी लक्ष वेधले.