उमरेडचे कोविड सेंटर झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:16+5:302021-07-21T04:08:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : २४ तास कोरोना रुग्णांसाठी बेडची सुविधा असलेल्या उमरेडच्या कोविड सेंटरला मंगळवारी (दि.२०) अखेर कुलूप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : २४ तास कोरोना रुग्णांसाठी बेडची सुविधा असलेल्या उमरेडच्या कोविड सेंटरला मंगळवारी (दि.२०) अखेर कुलूप लागले. तब्बल एक वर्षाच्या सेवाकार्यानंतर मंगळवारपासून उमरेड येथील कोविड सेंटरमधील औषधोपचार सेवा बंद करण्यात आली.
२२ जून २०२० ला उमरेड तालुक्यात कोरोनाची एन्ट्री झाली. त्यानंतर सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह येथे कोरोना रुग्णांसाठी सेंटर सुरू झाले. अशातच पहिली लाट ओसरली आणि हे सेंटर बंद झाले. यामुळे उमरेडच्या रुग्णांना भिवापूरच्या केंद्रावर उपचारासाठी पाठविण्यात आले. आरडाओरड झाल्यानंतर २३ मार्च २०२१ ला पुन्हा उमरेड येथील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे कोविड सेंटर सुरू झाले. याठिकाणी व्यवस्था कोलमडल्याने आणि रुग्णसंख्या वाढतीवर असल्यामुळे नूतन आदर्श महाविद्यालयात हे कोविड सेंटर हलविण्यात आले. याठिकाणी ८० बेडची व्यवस्था केल्यानंतर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर हे सेंटर सुरळीत सुरू होते. अशातच रुग्णसंख्या घटली. आरोग्य विभागाचा आदेश निघाला. यामध्ये कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त करा, असे फर्मान सोडण्यात आले. अखेरीस उमरेड कोविड सेंटरमध्ये कार्यरत २२ कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त करण्यात आले. मनुष्यबळास कार्यमुक्तीचे आदेश आणि कोविड सेंटर बंद करण्यावरून उमरेड परिसरात संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
....
ठिय्या आंदोलन सुरूच
एकीकडे तालुक्याची आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर असताना कोविड सेंटर अचानकपणे बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारपासून उमरेड येथे उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा मंत्री रोहित पारवे यांच्या नेतृत्वात आंदोलनास परिचारिकांसह अनेकांनी पाठिंबा दिला. जोपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक हा काळा आदेश मागे घेणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, डॉ. निशांत नाईक, नायब तहसीलदार प्रदीप वरपे यांच्याकडे या समस्येबाबत निवेदन सोपविण्यात आले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, उपाध्यक्ष गंगाधर फलके, दिलीप सोनटक्के, सतीश चौधरी, डॉ. मुकेश मुदगल, उमेश हटवार, बबलू लांडे, श्रीकृष्ण जुगनाके, धनंजय अग्निहोत्री, आदर्श पटले, अंजली कानफाडे, कपिल गायधने, राहुल किरपान, प्रदीप चिंदमवार, देवानंद गवळी, राहुल गायधने, तुषार ढोरे, कैलास ठाकरे, संजय चाचरकर, अमोल रायपूरकर, रुमित राहाटे, रोहित बक्सरे, लक्ष्मण मिरे, शुभम इनकने, जितू गिरसावळे, आकाश इनकने, नंदू मानकर, विशाल बेले आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी शासन-प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त केला आहे.