उमरेडचे ते रुग्ण ‘डेल्टा प्लस’बाधित नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:25+5:302021-07-01T04:07:25+5:30
नागपूर : जास्त संक्रामक आणि आजाराला घातक रूप देणारा ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ उमरेडच्या आठ रुग्णांमध्ये आढळून आला नसल्याने आरोग्य ...
नागपूर : जास्त संक्रामक आणि आजाराला घातक रूप देणारा ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ उमरेडच्या आठ रुग्णांमध्ये आढळून आला नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाचा दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ दिसून आला आहे. नीरीने आठ दिवसांपूर्वी या रुग्णांचे नमुने घेऊन हैदराबादच्या ‘सीसीएमबी’ प्रयोशाळेत पाठविले होते. केवळ आठ दिवसांच्या आतच बुधवारी अहवाल प्राप्त झाला.
उमरेडमधील एका कुटुंबात लग्न सोहळ्यासाठी मुंबईहून आलेल्या एका महिलेकडून एकाच घरातील १० जण पॉझिटिव्ह झाले. सुरुवातीला आठ जणांमध्ये कोरोना झपाट्याने पसरल्याने त्यांचे नमुने नीरीच्या लॅबमध्ये तपासणीसाठी आले. येथील तज्ज्ञांना विषाणूमध्ये बदलाची शंका आली. यामुळे हे नमुने ‘जिनोम सिक्वेंन्सिंग’साठी हैदराबादच्या ‘सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलेक्युलर बायलॉजी’ प्रयोगशाळेत पाठविले. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांना उमरेडच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्यात आले होते. ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे संशयित म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते; परंतु अहवालात जुना ‘डेल्टा व्हेरियंट’ आढळून आल्याने मोठे संकट टळल्याचे बोलले जात आहे.
‘डेल्टा प्लस’ची देशात २१ प्रकरणे
डेल्टा प्लस व्हेरियंटला ‘बी.१.६१७.२ स्ट्रेन म्हणूनही ओळखले जाते. भारतात फरिदाबाद, महाराष्ट्र, तामिळनाडू व मध्यप्रदेशात याचे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत या ‘व्हेरिएंट’ची २१ प्रकरणे समोर आली आहेत. यात मुंबईमध्ये २, रत्नागिरीमध्ये ९, जळगावमध्ये ७, पालघर, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक आहे. कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलांमध्ये ‘डेल्टा प्लस’ हा जास्त संक्रामक आहे. याच्या बाधिताला रुग्णालयात भरती करण्याची शक्यता २.६ टक्क्याने वाढते. या विषाणूमुळे रुग्ण गतीने गंभीर होण्याचा धोका अधिक असतो.