युएन केंद्र दहशतवाद्यांचा अड्डा
By admin | Published: July 31, 2014 01:02 AM2014-07-31T01:02:47+5:302014-07-31T01:02:47+5:30
गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे
नागपूर : गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे कॉन्सूलेट जनरल आॅफ इस्रायलचे ‘डेप्युटी चिफ आॅफ मिशन’ मतान जमीर यांनी नागपूर येथे सांगितले.
भारतातील सैनिकी शाळांची पाहणी करण्यासाठी जमीर नागपूर येथे आले होते. त्यांनी भोसला सैनिक शाळेला भेट दिल्यानंतर रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे लक्ष गाझापट्टीत सुरू असलेल्या हल्ल्याकडे वेधले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.
गाझापट्टीतील युएन केंद्रावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लहान मुलांसह मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचे वृत्त जगभर विविध वृत्त वाहिन्यांनी दाखविले होते. त्या संदर्भात बोलताना जमीर म्हणाले की, हे केंद्र ‘हमास’ या दशहतवादी संघटनेचे केंद्र झाले होते. तेथे संघटनेने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ठेवला होता. तेथून ते इस्रायलमधील शाळा, इस्पितळ आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करीत होते. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत होती. ती टाळण्यासाठी व हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
पॅलेस्टियनला देश म्हणून मान्यता देण्यात इस्रायलचा विरोध नाही, मात्र तरीही ‘हमास’कडून हल्ले होतच आहेत. आम्ही त्यांच्या लगत आहोत, त्यामुळे हे हल्ले अधिक तीव्र होत आहेत. असेच हल्ले पुढच्या काळात नायजेरियावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कट्टर मुस्लीम दहशतवादी संघटनांचा भारतासह इतरही देशांना धोका आहे, याकडे जमीर यांनी लक्ष वेधले.
इस्रायलला संघर्ष नको, पण ‘हमास’मुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. तीनवेळा युद्ध विराम झाल्यानंतरही ‘हमास’कडूनच त्याचे उल्लंघन करण्यात आले. नागरी वस्त्या आणि लहान मुलांवर हल्ले करण्यात आले. कोणी हल्ले करीतच असेल तर किती काळ शांत बसायचे, त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागते. या संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे. १ हजार ८८ पॅलेस्टियन्स आणि ५६ इस्रायली नागरिक ठार झाल्याचे आकडे माध्यमांमध्ये दाखवण्यात येत आहे.
मात्र या आकड्यावर जाऊ नका, रॉकेल मिसाईलचे हल्ले निकामी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा इस्रायलने निर्माण केल्याने आमची मनुष्य हानी कमी झाली आहे, असे जमीर म्हणाले. (प्रतिनिधी)