युनानी, सिद्धा, होमिओपॅथी प्रवेश चाचणी निकालाला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:44 AM2018-07-28T10:44:48+5:302018-07-28T10:47:34+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी युनानी, सिद्धा व होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीचा निकाल घोषित करण्यास हिरवी झेंडी दाखवली.

Unani, Siddha, Homeopathy entrance test, Green flag | युनानी, सिद्धा, होमिओपॅथी प्रवेश चाचणी निकालाला हिरवी झेंडी

युनानी, सिद्धा, होमिओपॅथी प्रवेश चाचणी निकालाला हिरवी झेंडी

Next
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णयआयुर्वेदच्या निकालावरील स्थगिती कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी युनानी, सिद्धा व होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीचा निकाल घोषित करण्यास हिरवी झेंडी दाखवली. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. परंतु, मूळ वाद आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीशी संबंधित असल्याने या चाचणीच्या निकालावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली.
या चारही पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २४ जून २०१८ रोजी प्रवेश चाचणी झाली. नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनीच्या कामठी रोडवरील कॉम्प्युटर लॅबमध्ये चाचणीदरम्यान ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप आहे. यासंदर्भात आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या किशोर सोनवाणेसह एकूण १८ विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने गेल्या गुरुवारी स्थगिती दिल्यामुळे चारही अभ्यासक्रमांचा निकाल थांबविण्यात आला होता.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे वकील अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी आज, प्रवेश चाचणीतील व्यवस्थेवर केवळ आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा आक्षेप असल्याचे सांगून, अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश चाचणीचा निकाल घोषित करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तसेच, या प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी ३० जुलैपर्यंत वेळ वाढवून मागितला.
न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी त्यांची विनंती मंजूर करून, प्रकरणावर ३१ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनुप ढोरे यांनी बाजू मांडली. अ‍ॅड. औरंगाबादकर यांना अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी सहकार्य केले.

असे आहे प्रकरण
देशातील २० शहरांमध्ये अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश चाचणी झाली. परीक्षा केंद्रांमध्ये नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनीच्या कॉम्प्युटर लॅबचा समावेश होता. या केंद्रामध्ये परीक्षा अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कर्तव्य बजावले नाही. विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करून उत्तरे सोडवत असताना त्यांना कुणीच टोकत नव्हते. याचिकाकर्त्यांनी लगेच परीक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक, जरीपटका पोलीस व शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची विनंती केली, परंतु याचिकाकर्त्यांचे कुणीच ऐकले नाही.

Web Title: Unani, Siddha, Homeopathy entrance test, Green flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.