आमदारांचे वेतनवाढीला एकमुखी समर्थन
By admin | Published: August 10, 2016 02:20 AM2016-08-10T02:20:22+5:302016-08-10T02:20:22+5:30
राज्य सरकारने आमदारांची वेतनवाढ व पेन्शनवाढ करणार प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे आता आमदारांना आता जवळपास दुप्पट वेतन मिळणार आहे.
जनतेलाच फायदा होईल : नागो गाणार यांचा विरोध
नागपूर : राज्य सरकारने आमदारांची वेतनवाढ व पेन्शनवाढ करणार प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे आता आमदारांना आता जवळपास दुप्पट वेतन मिळणार आहे. या वेतनवाढीचे नागपूर जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी समर्थन केले आहे. मतदारसंघात फिरण्यासाठी येणारा खर्च, मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी करावी लागणारी मदत आदींचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाढीव वेतनामुळे जनतेला अधिकाधिक मदत करता येईल, अशी भूमिका या आमदारांनी मांडली आहे. आ. नागो गाणार यांनी मात्र वेतनवाढीला विरोध दर्शविला असून वेतनवाढ हा जनतेशी धोका असल्याचे मत व्यक्त केले आहे.
खर्च पाहता वेतनवाढ योग्यच
आमदार हा देखील एक माणूसच असतो. प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढलेला आहे. अशा स्थितीत कुटुंब आणि मतदारसंघ सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. आर्थिक चणचण जाणवते. त्यामुळे वेतनवाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्याचे कारणच नाही. ज्या हिशेबाने मतदारसंघातील खर्च वाढला आहे त्यादृष्टीने वेतनवाढ योग्यच आहे.
-कृष्णा खोपडे, आमदार, पूर्व नागपूर
आमदारांची वेतनवाढ हा जनतेशी धोकाच
आमदारांची झालेली वेतनवाढ ही अत्यंत अयोग्य असून त्यावर होणारी टीका योग्यच आहे. विकास, शिक्षक किंवा जनतेच्या अपेक्षांशी जुळलेले काम असले की सरकारचे ठरलेले उत्तर असते, तिजोरीत खणखणाट आहे. विविध संघटनांना दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली नसताना स्वत:ची वेतनवाढ करुन घेणे म्हणजे जनतेशी धोका आहे. सरकारने मुळात असा प्रस्ताव आणायलाच नको होता.
-नागो गाणार, आमदार, विधान परिषद
चर्चा होणे अपेक्षित होते
आमदारांची झालेली वेतनवाढ योग्य की अयोग्य या मुद्यावर चर्चा होत आहे. परंतु मुळात सभागृहात या वेतनवाढीसंदर्भात शासनाने भूमिका स्पष्ट करायला हवी होती. वेतनवाढ का करणे आवश्यक आहे व आमदारांना काय समस्यांना सामोरे जावे लागते याबाबत शासनाने सविस्तर चर्चा घडवून आणायला हवी होती.
-प्रकाश गजभिये,
आमदार, विधान परिषद
प्रामाणिक आमदारांना दिलासा
मोठा मतदारसंघ सातत्याने हिंडणे, विविध प्रकारच्या वर्गणी, कर्मचारी, पाहुण्यांचे स्वागत इत्यादीसाठी बरेच पैसे लागतात. माझ्यासारख्या आमदाराला तर हे सर्व सांभाळत असताना कुटुंब चालविणेदेखील कठीण होते. राज्यात अनेक आमदार सामान्य वर्गातील आहेत. या वेतनवाढीमुळे प्रामाणिक आमदारांना दिलासा मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे भ्रष्टाचारदेखील कमी होईल.
-डॉ.मिलिंद माने, आमदार, उत्तर नागपूर
मानधनवाढीचा फायदा जनतेलाच
मी ग्रामीणचा आमदार आहे. मतदारसंघात तीन तालुके व ५०० गावांचा समावेश आहे. सुमारे १५० चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ आहे. सातत्याने प्रवास करीत असताना ग्रामीण आमदारांना दररोज दीड ते दोन हजार रुपयांचे डिझेल लागते. दोन ते तीन हजार रुपये मोबाईलचे बिल येते. कुणाला अॅडमिशनसाठी, औषधांसाठी तर कुणाची विविध गरज भागविण्यासाठी मदत करावी लागते. लोकप्रतिनिधींकडून नागरिकांच्या अपेक्षा असतात. विविध बैठकांना उपस्थित रहावे लागते. हे सर्व पाहता ही वाढ आवश्यक होती. त्याचा फायदा जनतेसाठीच होईल.
- आ. सुधीर पारवे, उमरेड
वेतनवाढ हा चर्चेचा विषयच नाही
आमदारांची वेतनवाढ झाली यात नवीन काहीच झालेले नाही. प्रशासकीय प्रक्रियेचा तो एक भाग आहे. याअगोदरदेखील वेतनवाढ झालेली आहे. या मुद्यावर विविध ठिकाणी चर्चा होत आहे. परंतु मुळात वेतनवाढ हा चर्चेचा विषय आहे असे मला वाटत नाही.
-अनिल सोले, आमदार, विधान परिषद