Nagpur | वाह रे कारवाई! दुचाकीसह चालकाला उचलले हवेत; व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 06:41 PM2022-07-22T18:41:22+5:302022-07-22T18:47:45+5:30
नो पार्किंगच्या नावावर अनधिकृत कारवाई, कंत्राटदारावर कारवाईचे निर्देश
नागपूर : सदर अंजुमन कॉम्प्लेक्सजवळ नो पार्किंगच्या जागी दुचाकी लावल्याने वाहतूक शखेच्या ‘हायड्रोलिक क्रेन’ने दुचाकीस्वारासह वाहन उचलल्याने खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त (वाहतूक) सारंग आवाड यांनी याची गंभीर दखल घेत कंत्राटदारावर कारवाईचे निर्देश दिले.
रस्त्यावरची वाढणारी गर्दी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरते आहे; परंतु वाढती वाहन संख्या, अपुरी पार्किंगची व्यवस्था यामुळे अनेकदा नाइलाजाने अथवा चुकून नो पार्किंगमध्ये वाहने लावतात. पूर्वी ही वाहने उचलण्याचे काम घिसाडघाईने होत होती. वाहनाचे नुकसान होत होते. याच्या तक्रारी वाढल्याने दरम्यानच्या काळात नो पार्किंगमधील वाहने उचलणे बंद होते; परंतु आता वाहतूक शाखेच्या वतीने यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जात आहेत. यासाठी ‘हायड्रोलिक क्रेन’चा वापर होत आहे. याची जबाबदारी ‘विदर्भ इन्फोटेक’ कंपनीला देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सदर अंजुमन कॉम्प्लेक्सजवळील ‘नो पार्किंग’च्या जागेवर एका तरुणाने दुचाकी लावली. जेव्हा वाहन उचलत होते तेव्हा दुचाकीचा मालक गाडीवरच येऊन बसला; परंतु त्या स्थितीतही पथकाने गाडी उचलली. याचा व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली.
- वाहन उचलण्याची एवढी घाई का?
नियमानुसार, वाहन उचलण्यापूर्वी साधारण १०० मीटरपर्यंत ऐकायला जाईल. अशा प्रकारे ध्वनिक्षेपकावर घोषणा करणे आवश्यक आहे. घोषणेनंतर पाच मिनिटांची प्रतीक्षा केल्यानंतर सदर वाहन उचलण्याचा नियम आहे; परंतु कंत्राटदार या नियमांना हरताळ फासत ‘नो पार्किंग’मधील वाहने उचलत आहेत. वाहन उचलण्याची एवढी घाई का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.