वडेगाव येथे भरला अनधिकृत मिरची बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:35+5:302021-04-28T04:09:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने साथराेग प्रतिबंधक कायद्याचा आधार घेत दिवसा जमाव तर रात्री संचारबंदी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने साथराेग प्रतिबंधक कायद्याचा आधार घेत दिवसा जमाव तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. मात्र, वडेगाव (ता. कुही) येथे मंगळवारी (दि. २७) अनधिकृत मिरची बाजार भरवण्यात आला असून, तिथे निवडक व्यापारी, अडतिया व शेतकऱ्यांनी गर्दी करीत जमावबंदीचे उल्लंघन केले. ही बाब काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याने मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने तीन अडतियांना कारणे दाखवा नाेटीस बजावल्या आहेत.
उदाराम तुळशीराम फेंडर, रा. वडेगाव, ता. कुही हे मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून, अडतियादेखील आहेत. त्यांनी त्यांच्या घराशेजारील माेकळ्या जागेवर मंगळवारी सकाळी ९ वाजता मिरची बाजार भरवला हाेता. विशेष म्हणजे, वडेगावला बाजार समितीचा उपबाजार नाही. त्यामुळे हा बाजार अनधिकृत ठरवण्यात आला. यात वाळलेल्या लाल मिरचीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला. या बाजारात शेतकरी, निवडक अडतिया व मिरची व्यापाऱ्यांनी गर्दी केली हाेती.
हा प्रकार माहीत हाेताच बाजार समिती व्यवस्थापनाने उदाराम फेंडर यांच्यासह अन्य दाेन अडतियांना कारणे दाखवा नाेटीस बजावल्या असून, स्पष्टीकरण देण्यासाठी २४ तासाचा अवधी दिला. मात्र, या तिन्ही अडतियांनी प्रत्यक्ष नाेटीस न स्वीकारल्याने त्यांना या नाेटीस पाेस्टाने पाठविण्यात आल्याची माहिती बाजार समिती व्यवस्थापनाने दिली. त्यांनी याचे लेखी स्पष्टीकरण वेळीच सादर न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व (विकास व नियमन) नियम १९६७ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
....
३८ क्विंटल मिरचीची खरेदी
या बाजारात ७० पाेती अर्थात ३८ क्विंटल मिरचीची खरेदी करण्यात आली, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. एका पाेत्यात ५५ किलाे मिरची भरली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या बाजाराला स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे अप्रत्यक्ष समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, वाढते काेराेना संक्रमण लक्षात घेता, मांढळ बाजार समिती व्यवस्थापनाने ३० एप्रिलपर्यंत बाजार व शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला हाेता. याबाबत त्यांनी संबंधितांना सूचनाही दिली हाेती.
...
वडेगाव येथे बाजार समितीचा उपबाजार नाही. त्यामुळे अशा प्रकारचा बाजार भरवणे हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमाचे उल्लंघन आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर याेग्य कारवाई केली जाईल.
- मनाेज तितरमारे,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मांढळ.
...
आर्थिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना त्यांची मिरची विकण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला हाेता, साेबतच मिरचीची पाेतीही आणली हाेती. त्यांना मदत म्हणून ती मिरची माणसांकरवी बाेली लावून विकून दिली. मी गुन्हा केला नसल्याने नाेटीस स्वीकारली नाही.
- उदाराम फेंडर, अडतिया,
कृषी उत्पन्न बाजार समिती, मांढळ.