रुग्णालयांचे अनधिकृत बांधकाम पाडा
By Admin | Published: January 20, 2017 02:02 AM2017-01-20T02:02:21+5:302017-01-20T02:02:21+5:30
धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधील अनधिकृत बांधकामे तत्काळ पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या
उच्च न्यायालयाचे आदेश : धंतोलीत ‘पार्किंग’च्या जागेचा होतोय दुरुपयोग
नागपूर : धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधील अनधिकृत बांधकामे तत्काळ पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नागपूर महानगरपालिकेला दिले. विविध दवाखान्यांमध्ये ‘पार्किंग’च्या जागेचा उपयोग स्वागतकक्ष तसेच ‘वेटिंगरुम’साठी होत आहे. याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
धंतोलीत गल्लोगल्ली रुग्णालये उघडण्यात आली असून अनेक रुग्णालयांच्या संचालकांनी पार्किंग व इतर नियमांची पायमल्ली केली आहे. यासंदर्भात धंतोली नागरिक मंडळाचे अध्यक्ष विलास लोठे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. तसेच याबाबतचा अहवाल देखील न्यायालयात सादर करायचा आहे.
याशिवाय जनआक्रोश या सामाजिक संस्थेने पार्किंगच्या मुद्यावर काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यावर वाहतूक पोलीस उपायुक्त, महापालिकेचे सहायक आयुक्त, झोनल आॅफिसर, वॉर्ड आॅफिसर यांनी संयुक्त बैठक घेऊन या उपाययोजनांवर विचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता के. एच. देशपांडे तर महानगरपालिकेतर्फे अॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)