मेट्रो रिजनमधील अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण
By admin | Published: June 8, 2017 02:52 AM2017-06-08T02:52:26+5:302017-06-08T02:52:26+5:30
मेट्रो रिजन अंतर्गत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.
आता एनएमआरडीए मार्फत होणार कामे : तात्त्विक मंजुरी मिळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रिजन अंतर्गत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणानंतर संबंधित बांधकाम तोडण्याचा किंवा ते नियमानुसार मंजूर करण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. या सर्व कामासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे.
नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) च्या कार्यसमितीची बुधवारी बैठक झाली. तीत संबंधित निर्णय घेण्यात आला.
बैठकीला कार्यसमितीचे अध्यक्ष व राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, समितीचे सदस्य व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंद कुमार साळवे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार उपस्थित होते. या बैठकीत नासुप्रतर्फे करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. मेट्रो रिजनच्या भागात नासुप्रतर्फे करण्यात येत असलेली विकास कामे आता एनएमआरडीए मार्फत अमलात आणली जातील याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. सुमठाणा (मिहान) सुधार योजनेंतर्गत रस्ते व जलवाहिनी टाकण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली.
मेट्रो रिजनच्या आवंडी-भवरी-गुमथळा या नव्या लॉजिस्टिक्स सुधार योजनेची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. गोंडखैरी चिंचभवन-पेंढरी येथे कामे करण्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरिता प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
विकास प्राधिकरणासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध तयार करणे व प्रशासकीय कामांसाठी नासुप्र सभापती व मेट्रो रिजन समितीचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.