हातगाड्यांवर विनापरवाना खाद्यान्न विक्री
By admin | Published: July 14, 2017 02:25 AM2017-07-14T02:25:15+5:302017-07-14T02:25:15+5:30
शहराच्या विविध भागातील हॉटेल्स आणि हातगाड्यांवर खुले पदार्थ विकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात : अन्न व औषध प्रशासन विभाग करतो काय?
मोरेश्वर मानापुरे। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या विविध भागातील हॉटेल्स आणि हातगाड्यांवर खुले पदार्थ विकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक बेकायदेशीर आहेत. ज्यांनी परवाने घेतले आहेत, तेही स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत. धंतोली, बजाजनगर, वर्धमाननगर या भागात हातगाड्यांवर पावभाजी वा अन्य खाद्यान्न विकणाऱ्या हातगाड्यांची पाहणी केली असता, सर्वत्र घाण दिसून आली. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, शिवाय एकाही विक्रेत्याकडे अन्न व प्रशासन विभागाचा परवाना नव्हता. आम्ही पदार्थ विकणार, मात्र स्वच्छता मनपा करणार, असा सर्वांचा कल होता. सर्वत्र घाणीचे साम्राज्य असताना नागपूर ‘स्मार्ट सिटी’ कशी होणार, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
धंतोली भागात सुलभ शौचालयालगत हातठेले, गार्इंचा वावर
धंतोली येथील मैदानाची पाहणी केली असता त्या भागात जवळपास पावभाजी, पाणीपुरी आणि चिकन बिर्याणी विक्रेत्यांचे हातठेले आहेत. हातठेल्याजवळच सुलभ शौचालय आहे. शौचालयाची दुर्गंधी परिसरात पसरते तसेच हातठेल्यावर उरलेले अन्न मैदानालगत टाकण्यात येते. त्यामुळे या भागात गार्इंचा वावर ही नेहमीची बाब आहे. मनपा हा परिसर केव्हा स्वच्छ करते, हे एक गूढच आहे. एक विक्रेता नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला, तीन वर्षांपूर्वी अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक वर्षाचा खाद्यान्न परवाना दिला होता, पण त्याचे नूतनीकरण केलेले नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खाद्यान्नाची विक्री करतो. कारवाई होईल तेव्हा दंड भरू. आता तर व्यवसाय करू द्या, असे तो म्हणाला.
कुजलेल्या अन्नामुळे दुर्गंधी
हातगाड्यांवर उरलेले अन्न नालीत टाकले जाते. ते कुजल्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. धंतोली भागातील नागरिक विकास धर यांनी यासंदर्भात मनपाकडे तक्रार केली आहे. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कुणीही अधिकारी फिरकून पाहत नाही. त्यामुळे हे विक्रेते कुणालाही जुमानत नाहीत. अन्न व प्रशासन विभागाने परवाने द्यावेत आणि मनपाने कारवाई करून त्यांना तंबी द्यावी आणि दंड आकारावा, अशी सूचना त्यांनी लोकमतशी बोलताना केली.
हातगाड्या आणि हॉटेल्सच्या परवान्याची तपासणी कधी?
हातगाडीवरील विक्रेते आणि सर्वच हॉटेल्समध्ये अन्नसुरक्षा मानके कायद्यातील तरतुदींचे पालन होत नाही. त्यानंतरही अधिकारी कारवाई करीत नाही. अपुरे कर्मचारी असल्याचे नेहमीच कारण देण्यात येते. धंतोली येथील एका हॉटेलमध्ये नालीच्या काठावर उघड्यावर पदार्थ तयार केले जातात. सर्वत्र अस्वच्छता असते. निकषांच्या आधारे त्वरित बंद व्हावे, अशी या हॉटेल्सची परिस्थिती आहे. पण कारवाई कधी आणि केव्हा करणार, हा गंभीर प्रश्न आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये पाण्यासाठी आरओ सिस्टीम असणे आवश्यक असूनही प्रशासन त्याबाबत कोणतीही सक्ती करीत नाही.
शहरात विनापरवाना आणि अस्वच्छ वातावरणात कितीतरी हॉटेल्स सुरू आहेत. साथीचे रोग पसरण्यास तेही एक कारण आहे. प्रशासनाने तपासणीकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी हॉटेल्सची तपासणी करण्याची गरज आहे. हॉटेल किंवा खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान सुरू करण्यासाठी बरेच परवाने घ्यावे लागतात. शॉप अॅक्टचा परवाना आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात येणारा ‘इटिंग रूम’चा परवाना महत्त्वाचा असतो. ज्या ठिकाणी बसून खाद्यपदार्थ खाल्ले जातात, त्या जागेसाठी हा परवाना असतो. तो नसेल, तर ते हॉटेल बेकायदेशीर ठरते. या परवान्यात स्वच्छतेच्या अटी घातलेल्या असतात. त्यांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित हॉटेलचालकावर असते. शिवाय त्यांची नियमित तपासणी करण्याचे काम अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेला करावे लागते. शहरात मात्र या सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे.
तपासणीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा कानाडोळा
नागरिकांना सुरक्षित अन्न आणि औषधी मिळावी म्हणून संबंधितांवर शासनाचे नियंत्रण आहे. ही जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून खाद्यान्न विक्रेत्यांची नियमित तपासणी केली जात नसल्याचेच दिसून येत आहे. शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये दूषित पाण्याचा वापर होतो. शिवाय तेलामध्येही मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी येतात. उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. छोटेखानी दुकानांची चौकशीच केली जात नसल्याने ते उघड्यावरील खाद्यान्न सार्वजनिक आरोग्यास अपायकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचीही तपासणी करण्याची गरज आहे.
भेसळयुक्त खाद्य तेलाची तपासणी सक्तीची
खाद्यपदार्थांच्या तपासणीपूर्वी भेसळयुक्त खाद्य तेलाची तपासणी गरजेची आहे. खाद्य तेलामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. भेसळयुक्त खाद्य तेल आरोग्याकरिता अपायकारक आहे. अशा तेलाबाबत कुठल्याही प्रकारची पाहणी अन्न व औषधी प्रशासनाने केल्याची नोंद नाही. हॉटेल चालविताना स्वयंपाकगृह स्वच्छ ठेवले जावे, शुद्ध पाण्याचा वापर व्हावा, हॉटेलचा परिसर स्वच्छ असावा, सर्व खाद्यपदार्थ झाकून ठेवलेले असावे यासह अन्य नियमांचे पालन करावे लागते. पण उघड्यावर खाद्यान्न विकणारे विक्रेते आणि बहुतांश हॉटेल्समध्ये या नियमांना पायदळी तुडविले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते.