नागपूर राज्य खनिकर्म महामंडळाने काढल्या रेतीच्या अनधिकृत निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 09:38 PM2018-11-14T21:38:22+5:302018-11-14T21:40:00+5:30
महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ) ने अनधिकृतपणे रेती घाटाचे टेंडर काढले आहे, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि सचिव अरुण वनकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ) ने अनधिकृतपणे रेती घाटाचे टेंडर काढले आहे, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि सचिव अरुण वनकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत केला.
पवार आणि वनकर यांनी सांगितले की, राज्य खनिकर्म महामंडळाने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीद्वारे रेती घाटाचे टेंडर मागितले आहे. रेती खनन, परिवहन, साठवणूक, लोडिंग आदींबाबत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील रेती घाटासंबंधात हे टेंडर आहे. रेती घाटासंदर्भात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन यासंबंधात मायनिंग कॉर्पोरेशनला टेंडर काढण्याचे अधिकार आहेत. तसेच पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्रही घ्यावे लागते. परंतु मायनिंग कॉर्पोरेशनचे प्रबंध संचालक एस. राममूर्ती यांनी अशी कोणतीही रीतसर परवानगी न घेता आणि मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असताना हा स्थगनादेश काढला आहे. याशिवाय टेंडर भरणाऱ्या उद्योगपतींना प्रत्येकी ५० लाख रुपये भरण्याचेही जाहीर केले आहे. यामुळे अनेक टेंडर अग्रीम राशी भरणाऱ्या उद्योगपतींचीही फसवणूक झाली आहे.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबत न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.