१२ डिसेंबरच्या मोर्चातील शरद पवारांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:12 PM2017-11-29T12:12:10+5:302017-11-29T12:12:36+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी निघणार आहे. मोर्चात पवार स्वत: सहभागी होणार असल्यामुळे तेच केंद्रस्थानी असतील. राष्ट्रवादीचाच उदोउदो होईल या शक्यतेमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
कमलेश वानखेडे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून भाजपा सरकारची कोंडी करण्याची रणनीती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. मात्र, आता दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी निघणार आहे. मोर्चात पवार स्वत: सहभागी होणार असल्यामुळे तेच केंद्रस्थानी असतील. राष्ट्रवादीचाच उदोउदो होईल या शक्यतेमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. राष्ट्रवादीने नेहमी काँग्रेसला दडपण्याचा प्रयत्न केला. आता राष्ट्रवादी विदर्भात अखेरच्या घटका मोजत असताना मोर्चात सोबत घेऊन नवसंजीवनी कशासाठी दिली जात आहे, असे प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केले आहेत.
एकत्रित मोर्चा काढून त्यात शरद पवारांना सहभागी करून घेण्याची भूमिका बऱ्याच काँग्रेस नेत्यांना रुचलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भात धुव्वा उडाला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीची ‘टिकटिक’ बंद पडली. विदर्भातील घटत्या जनाधाराची चाहुल लागताच शरद पवार सक्रिय झाले व त्यांनी गेल्या दोन महिन्यात दोनदा विदर्भाचा दौरा केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आढावा बैठका घेत राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न केला. पाय पसरण्यासाठी धडपड करणाऱ्या राष्ट्रवादीला काँग्रेस आयती ‘रेड कार्पेट’ टाकून देत आहे, अशी काही काँग्रेस नेत्यांची भावना आहे.
गेल्यावर्षी काँग्रेसने स्वबळावर काढलेल्या मोर्चात लाखावर गर्दी झाली होती. हा मोर्चा यशस्वी झाल्याने काँग्रेससह प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना बळ मिळाले होते. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सरकारविरोधात नाराजी वाढली आहे. सरकारविरोधी मते आयती काँग्रेसच्या झोळीत पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यावेळी मोर्चाला आणखी जास्त प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. असे सकारात्मक चित्र तयार झाले असताना आता राष्ट्रवादीला सोबत घेणे म्हणजे आपला वाटा दुसऱ्यांच्या पदरात टाकण्यासारखे आहे. राष्ट्रवादीला साथ देऊन काँग्रेसच्या जनाधाराची विभागणी कशासाठी करायची, राष्ट्रवादीच्या घडाळ्याला चावी कशासाठी भरायची, असे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण २९ व ३० नोव्हेंबर रोजी नागपुरात मोर्चाच्या तयारीसाठी बैठका घेणार आहेत. या बैठकीतही नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.
होर्डिंग्जवरील फोटोवरून संभ्रम
दोन्ही पक्षांचे मोर्चे वेगवेगळे निघतील व व्हेरायटी चौकात एकत्र येतील. या मोर्चाच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात येणारे होर्डिंग्ज वेगवेगळे असतील की एकत्र असतील, दोन्ही पक्षांचे एकच होर्डिंग केले तर त्यावर कुणाकुणाचे फोटो असतील, फोटोंचा प्राधान्यक्रम कसा असेल, असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सन्मान देण्याच्या प्रयत्नात काँग्रेसच्या नेत्यांचा होर्डिंग्जवरील क्रम घसरला जाऊ नये, अशी चिंताही काँग्रेस नेत्यांना सतावत आहे. मोर्चासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. आता दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा होत असल्यामुळे खर्चाचे नियोजन कसे केले जाईल, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
भाजपापासून तोडण्यासाठी पवारांना पुढे केले
गेली तीन वर्षे राज्यातील भाजपा सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे छुपे पाठबळ मिळत होते. काँग्रेसने भाजपाविरोधात खेळलेले डाव राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे उलटे पडत होते. या मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना विरोधी भूमिकेत आणता येईल. यामुळे पुढील काळात राष्ट्रवादी भाजपापासून दुरावेल व सत्ताधाराºयांची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने आखलेल्या मोहिमेला यश मिळेल. राष्ट्रवादीला भाजपापासून तोडण्यासाठी शरद पवारांना पुढे करण्याची भूमिका काँग्रेसने विचारपूर्वक घेतली आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
काँग्रेस नेत्यांच्या मनातील चिंता
विदर्भात राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. अशात मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेसचा ‘हात’ धरून राष्ट्रवादी पुन्हा पाय रोवू पाहत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा शरद पवार यांच्या वाढदिवशी निघणार असल्याने व ते मोर्चात सहभागी होणार असल्यामुळे पवार हेच केंद्रस्थानी राहतील. त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व दबून जाईल.
मोर्चात गर्दी जमली तर पवारांच्या नावावर लोक आले, असा प्रचार राष्ट्रवादीकडून केला जाईल व मोर्चाच्या यशाच्या श्रेय आपसुकच राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल.
मोर्चामुळे राष्ट्रवादीचा उत्साह वाढेल व पुढे आघाडी करून लढायचे झाले तर विदर्भात ताकद वाढल्याचा दावा करून राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करेल. अशात एवढे परिश्रम करून काँग्रेसला काय मिळेल, असे प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस नेत्यांनी चिंताही व्यक्त केली आहे.