बेवारस बॅग तपासली, बीप वाजले; बाँम्बच्या शंकेने एअरपोर्टवर धावपळ
By नरेश डोंगरे | Published: November 5, 2023 10:18 PM2023-11-05T22:18:58+5:302023-11-05T22:19:10+5:30
बीडीडीएसकडून चाैकशी : बॅगेत निघाली औषधी अन् कपडे
नागपूर : बेवारस बॅग आणि तिच्या तपासणीदरम्यान अलार्म वाजल्याने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी काही वेळेसाठी चांगलीच खळबळ उडाली. बॅगमध्ये बॉम्ब आहे की काय, अशी शंका निर्माण झाल्याने बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथक बोलविण्यात आले. कसून तपासणी केल्यानंतर बॅगमध्ये काहीच नसल्याचे स्पष्ट झाले आणि संबंधितांचा जीव भांड्यात पडला.
रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास विमानतळाच्या पार्किंग परिसरात एक बेवारस बॅग पडून असल्याची सूचना सीआयएसएफला मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची वेळ जवळ (व्हीव्हीआयपी मुव्हमेंट) आली असताना ही सूचना मिळताच सीआयएसएफने बीडीडीएस पथक तातडीने बोलवून घेतले. एका कारजवळ आढळलेल्या काळ्या रंगाच्या बॅगची ईव्हीडी (एक्सप्लोसिव्ह वेपर डिटेक्टर) ने तपासणी केली जात असताना अलार्म वाजला. त्यामुळे नंतर या बॅगची बीडीडीएसच्या श्वानाने तपासणी केली.
श्वानाकडून कसलेही संकेत न मिळाल्याने सुरक्षा यंत्रणेने ईटीडी (एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्शन)ने बॅग तपासली. दरम्यान, एअरपोर्ट ऑपरेशनल एरिया बाहेरचे प्रकरण असल्याने सीआयएसएफने शहर पोलिसांनाही सूचित केले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सूक्ष्म तपासणी करून 'धोका' नसल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधितांचा जीव भांड्यात पडला.
बॅगमध्ये आढळली औषधे
संबंधितांनी सांगितले की बॅगमध्ये काही औषधे आणि कपडे तसेच आणखी काही साहित्य होते. उन्हामुळे ते गरम आले तर तपासणी करताना मशिनमधून अलार्म वाजतो. दरम्यान, या घडामोडीमुळे विमानतळ परिसरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले.