काका-पुतण्या नागपूर जिल्ह्यातील वेणा नदीत बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 21:49 IST2019-09-11T21:46:46+5:302019-09-11T21:49:17+5:30
हिंगणा तालुक्यातील संगम व खैरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदी पात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले काका-पुतण्या बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

काका-पुतण्या नागपूर जिल्ह्यातील वेणा नदीत बुडाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (हिंगणा) : तालुक्यातील संगम व खैरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदी पात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले काका-पुतण्या बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. सुरेश शिवराम फिरके (४८) व त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके (१८) रा.डिगडोह (देवी) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी डिगडोह देवी येथील फिरके व आजूबाजूला असलेल्या दोन घरच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी काही लोक वेणा नदीवर गेले होते. सायंकाळी ६.३० वाजता सुमारास गणेश विसर्जन आटोपून अंघोळ करण्यासाठी ते नदीपात्रात उतरले. सुरेश हे खोल पाण्यात गेले असता त्यांना वाचविण्यासाठी अजिंक्य पुढे गेला. परंतू दोघेही पाण्याच्या प्रवाहात स्वत:ला सांभाळू शकले नाही व वाहत गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगण्याच्या पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर व हेड कॉन्स्टेबल बतकल सह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले आहे. परंतु अद्याप प्रवाहात त्यांचा शोध लागला नाही. या घटनेमुळे डिगडोह गावात शोककळा पसरली आहे.