अनियंत्रित स्कूलबस अपघात; पोलिस-प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेला सम्यकचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 08:12 PM2022-11-23T20:12:30+5:302022-11-23T20:13:42+5:30
Nagpur News स्कूलबसच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पालकांनी पोलिस आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
नागपूर : स्कूलबसच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पालकांनी पोलिस आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, अपघातामुळे मृत विद्यार्थी सम्यक दिनेश कळंबे याची मेरी पॉस्टपीन शाळा आज बंद ठेवण्यात आली होती. गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता तेथे पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
मंगळवारी शाळा संपल्यानंतर सम्यक दोघांसह घरी जाण्यासाठी ऑटोची प्रतीक्षा करत होता. दरम्यान, स्कूलबस क्रमांक (एमएच ४०-एटी-०४८७)च्या चालकाने सम्यकसह तीन विद्यार्थ्यांना धडक दिली. सम्यकचा यात मृत्यू झाला. या घटनेमुळे पालक आणि कॅम्पसमधील नागरिक संतप्त झाले आहेत.
दोन किलोमीटरच्या परिसरात तीन मोठ्या शाळा आहेत. तेथे स्कूलबस, व्हॅन, ऑटो यांची वर्दळ असते. वेळेवर पोहोचण्यासाठी वाहने वेगात चालतात. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडतात. शाळा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली. पण कोणीही ते गांभीर्याने घेतले नाही. त्याचा परिणाम अपघाताच्या रूपात झाला.
शाळा सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळी प्रचंड गोंधळ उडतो, असे पालकांचे म्हणणे आहे. अपघातानंतर पोलिस किंवा वाहतूक विभाग स्कूलबस, व्हॅन आणि ऑटोची तेवढ्यापुरती चौकशी करतात. काही दिवसांनी परिस्थिती ‘जैसे थे’ होते. ताजी दुर्घटनाही बसमधील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे समोर आले आहे. बसचालक अंबादास रामटेके (७०, तुळशीनगर, शांतीनगर) याने ब्रेक फेल झाल्याने बसचे नियंत्रण सुटल्याचे सांगितले. रामटेके सेवानिवृत्त एसटी चालक असून, २०१० पासून स्कूलबस चालवत आहे. रामटेकेला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.