चालकाला डुलकी, अनियंत्रित ट्रॅव्हल्स उलटली; ३४ प्रवासी किरकाेळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 05:45 PM2022-08-24T17:45:14+5:302022-08-24T18:17:02+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील १४ मैल परिसरातील घटना
धामणा (नागपूर) : चालकाला वाहन चालवताना डुलकी लागली आणि वेगात असलेली ट्रॅव्हल्स अनियंत्रित हाेऊन राेडलगत उलटली. यात ट्रॅव्हल्समधील ३४ प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी (ता. कळमेश्वर) लगतच्या १४ मैल परिसरात आज (दि. २४) सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.
जखमींमध्ये ट्रॅव्हल्स चालक मोनू राव (३६) व इम्रान खान (४०) दाेघेही रा. इंदाेर, मध्य प्रदेश, उर्वशी रजत (३०, रा. छतीसगड), चित्रलेखा शाहू (३०) व अजित सिंग (३३) दाेघेही रा. पुणे, श्रेयस जाधव (२५) व स्नेहल पवार (२१) दाेघेही रा. सातारा, शंकर घुगे (२२, रा. मालेगाव, जिल्हा वाशिम) यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सर्व प्रवासी एनएल-०७/बी-०६०६ क्रमांकाच्या हंस कंपनीच्या ट्रॅव्हल्सने पुण्याहून नागपूर मार्गे रायपूर (छत्तीसगड)ला जात हाेते.
दरम्यान, १४ मैल परिसरात चालकाचा वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सवरील ताबा सुटला आणि ती ट्रॅव्हल्स राेडलगत नालीत शिरून उलटली. यात ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी किरकाेळ जखमी झाले. अपघात हाेताच खुर्सापार वाहतूक पाेलीस चाैकीतील पाेलीस कर्मचाऱ्यांसह कळमेश्वर पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना ट्रॅव्हल्समधून काढले. प्रवाशांनी उपचार केल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
प्रवाशांच्या सूचनेकडे चालकाचे दुर्लक्ष
या ट्रॅव्हल्समध्ये मोनू राव व इम्रान खान हे दाेन चालक हाेते. इम्रानने पहाटे स्टेअरिंग हाती घेतले. ताे ट्रॅव्हल्स व्यवस्थित चालवित नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी माेनूला ट्रॅव्हल्स चालविण्याची सूचना केली. मात्र, दाेन्ही चालकांनी प्रवाशांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. इम्रानने मध्येच एका हाॅटेलजवळ ट्रॅव्हल्स थांबविली हाेती. त्याला चक्कर येत असल्याने प्रवाशांनी त्याला औषध घेऊन आराम करण्याची सूचना केली हाेती. अशा स्थितीत त्याने गुटका खाऊन पुन्हा ट्रॅव्हल्स चालवायला सुरुवात केली आणि हा अपघात झाला.
पर्यायी ट्रॅव्हल्सची व्यवस्था
ही ट्रॅव्हल्स २०० फूट फरफटत जावून राेडलगतच्या नालीत उलटली. सर्व प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढण्यात आल्यानंतर दाेन क्रेनच्या मदतीने ती ट्रॅव्हल्स बाहेर काढण्यात आली. सर्व जखमी प्रवाशांवर उपचार केल्यानंतर त्यांना पर्यायी ट्रॅव्हल्सची व्यवस्था करून रायपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले.