कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेचे त्रिभाजन होऊ देणार नाही, विधानसभेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 01:48 PM2017-12-19T13:48:27+5:302017-12-19T13:55:05+5:30
काँग्रेस नेते आणि आमदार नसीम खान यांनी मंगळवारी विधानसभेत मुंबई महापालिकेचे विभाजन करुन तीन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी केली.
नागपूर - काँग्रेस नेते आणि आमदार नसीम खान यांनी मंगळवारी विधानसभेत मुंबई महापालिकेचे विभाजन करुन तीन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवरुन विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. नसीम खान यांच्या या मागणीवर शिवसेना आणि भाजपाचे आमदार प्रचंड आक्रमक झाले.
कुठल्याही परिस्थितीत मुंबईचे तुकडे पडू देणार नाही अशी भूमिका घेत शिवसेना-भाजपा आमदारांनी जोरदार गदारोळ केला. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. कुर्ला पश्चिमेकडील मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ‘एल’ वॉर्डच्या खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी लागलेल्या आगीत, तब्बल बारा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुद्यावर चर्चा सुरु असताना नसीन खान यांनी ही मागणी केली.
मालाडचा चांदीवली विधानसभा मतदारसंघ हे नसीम खान यांचे कार्यक्षेत्र आहे. सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी नसीम खान यांची मागणी धुडकावून लावली. काँग्रेसची मागणी निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेचे त्रिभाजन होऊ देणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.