उपराजधानीत ‘स्मार्ट स्ट्रीट’
By Admin | Published: June 26, 2016 02:48 AM2016-06-26T02:48:48+5:302016-06-26T02:48:48+5:30
नागपूर महापालिकेने पुन्हा एकदा स्मार्ट सिटीसाठी दावा सादर केला आहे.
जपानी गार्डन ते खामला चौक रस्त्याची निवड
नागपूर : नागपूर महापालिकेने पुन्हा एकदा स्मार्ट सिटीसाठी दावा सादर केला आहे. स्मार्ट सिटीच्या सुधारित प्रारूपाला शनिवारी राज्य सरकारकडे सादर करण्यात आले. राज्य सरकारमार्फत ३० जूनपर्यंत केंद्र सरकारला सुधारित प्रारूप सादर केले जाईल. नागपुरात स्मार्ट सिटीअंतर्गत ‘स्मार्ट स्ट्रीट’ बनविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी जपानी गार्डन ते खामला चौकादरम्यानच्या ५.५० कि.मी. लांबीच्या रस्त्याची निवड करण्यात आली आहे. या स्मार्ट स्ट्रीटमध्ये फ्री पार्किंग, वायफाय फ्री, स्मार्ट कियॉस्क, स्मार्ट परिवहन आदी सुविधा राहतील.
स्मार्ट सिटी मिशनला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, राज्य सरकारतर्फे स्मार्ट सिटी आवश्यक सिटी सर्व्हिलन्स, सिटी कियॉस्क, सिटी वायफाय व स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जातील. या सर्व बाबींचा स्मार्ट सिटीत समावेश आहे.
‘स्मार्ट स्ट्रीट’ प्रकल्प नऊ महिन्यात साकारण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने आधीच पावले उचलली आहेत. स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पावर राज्य सरकार, गृह विभाग तसेच स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत निधी मिळणार आहे. महापालिकेलाही आपल्या वाट्याची रक्कम खर्च करावी लागेल. गेल्यावेळी प्रयत्न करूनही स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूर महापालिका ३१ व्या क्रमांकावर राहिली होती. आता प्रस्तावात आवश्यक बदल करण्यात आले असल्याचे हर्डीकर यांनी स्पष्ट केले. यावेळी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली जुन्या प्रारूपाला सुधारण्यात आले आहे. यात मेट्रो रेल्वे, नाग नदी प्रकल्प, पॉलिसेंट्रिक सिटी डेव्हलपमेंट, एरिया बेस्ड डेव्हलप आदींचा विस्तृतपणे समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रकारे नासुप्रशी जुळलेल्या कार्यक्षेत्रातील अधिकारासंबंधी अडचणींनाही दूर करण्यात आले आहे. अशा अवस्थेत नागपूर निवडीसंदर्भात आशावादी आहे.