भाजपच्या तोरणाखाली पवार-शिंदेंची आली हाे जोडी..; गावोगावी पोळ्याच्या तोरणाखाली आज झडत्यांची रंगत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 10:36 AM2023-09-14T10:36:08+5:302023-09-14T10:38:37+5:30

शेतकऱ्यांची कैफियत आणि राजकीय व्यंगही

under the arch of the pola festival in every village, the colors of the Jhadtya; Farmers' situation and political satire too | भाजपच्या तोरणाखाली पवार-शिंदेंची आली हाे जोडी..; गावोगावी पोळ्याच्या तोरणाखाली आज झडत्यांची रंगत

भाजपच्या तोरणाखाली पवार-शिंदेंची आली हाे जोडी..; गावोगावी पोळ्याच्या तोरणाखाली आज झडत्यांची रंगत

googlenewsNext

नागपूर : सण एक दिन! बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायाचे!! कवी यशवंत यांनी बैलांच्या काबाडकष्टाचे यथार्थ वर्णन केले आहे. आज पोळ्याला सर्जा- राजाला छान सजवून, शिंगे रंगवून चमकदार बेगड लावून शिंगावर बाशिंग आणि अंगावर ऐनेदार झुली चढवून तोरणाखाली आणले जाते. पोळ्याच्या आदल्या दिवशी विदर्भात ‘उद्या आवतन घ्या’ म्हणत बैलांची खांदाशेकणी केली जाते. वर्षभर जू ओढणाऱ्या बैलांच्या मानेवर तूप चोळले जाते.

बैल आणि शेतकऱ्यांचे सुख-दु:खाचे पूर्वापार चालत आलेले नाते कविता- गाण्यांमधून व्यक्त होत आले आहे. विशेषत: विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये झडत्यांच्या रूपात पोळ्याच्या तोरणाखाली रंगणाऱ्या झडत्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा धनज येथील कवी बबन चौधरी यांनी व्यंगातून राजकीय नेत्यांची झाडाझडती घेतली आहे. ते म्हणतात,

भाजपच्या तोरणाखाली पवार- शिंदेंची आली हो जोडी,

दोघांच्या पाठीवर पांघरली झूल, मागच्या जन्माची पडली हो भूल...

डोईवर बांधले बाशिंग छान, दिल्लीच्या तालावर हलवते मान...

दुसऱ्या एका कवितेत त्यांनी धो- धो पावसाने शेतातील होतं- नव्हतं वाहून गेल्याची कैफियत मांडताना सरकारच्या तुटपुंज्या मदतीचा पंचनामाच केला आहे. ते म्हणतात,

पुढारी आले पाहून गेले...

कर्मचारी आले लिहून गेले...

सरकारनं केली मदत, जयला नाही धूप,

गरिबाच्या भाकरीवर कवाचं नोयतं तूप...

एक नमन गौरा पार्वती, हर बाेला हर हर महादेव...

कापसाचे उतरले भाव, सोयाबीन आलं खाली,

शेतकरी करते आत्महत्या उरला नाही हो वाली...

या ओळी शेतकऱ्यांचे भीषण वास्तव मांडतात. राजकीय नेत्यांना व्यंगात्मक चिमटे घेताना ते म्हणतात,

पुढाऱ्याले फुरसत नाही, त्यायच्या मागं ईडी,

इकडून तिकडे पया लागते नायीतं पडते हो बेडी,

गंगेत जाऊन न्हायचं म्हणजे पाप नष्ट होते,

सत्तेत जाऊन बसन त्याले क्लीनचिट भेटे...

याशिवाय आभाळ गडगडे, शिंग फडफडे,

शिंगात पडले खडे... एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव

यासारख्या पारंपरिक झडत्यांची चढाओढीने लागणारी झड पोळ्याची रंगत वाढवत असते.

Web Title: under the arch of the pola festival in every village, the colors of the Jhadtya; Farmers' situation and political satire too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.