कंत्राटी कर्मचारी संपावर, आराेग्य सेवा ऑक्सिजनवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:09 AM2023-10-17T11:09:05+5:302023-10-17T11:12:16+5:30
संविधान चाैकात हजाराेंचे आंदोलन : २५ ऑक्टाेबरपासून बेमुदत संपाची घाेषणा
नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साेमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. संपकरी कर्मचाऱ्यांनी संविधान चाैकात धरणे आंदाेलन केली. त्यामुळे शहर व ग्रामीण रुग्णालयांच्या आराेग्य व्यवस्थेला फटका बसला.
या संपामध्ये कंत्राटी परिचारिका, एएनएम, जीएनएम, एलएचव्ही, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच एनयूएचएम व एनएचएम अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. एनएचएम कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायाेजन कृती समितीचे मुख्य समन्वयक पवन वासनिक यांनी आंदाेलनानंतर झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले, महाराष्ट्रात आराेग्य विभागात हजाराे पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायाेजन करण्याची मागणी या आंदाेलनाद्वारे करण्यात येत आहे. इतर राज्यांत एनएचएम अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना विविध विभागांतील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आलेले आहे, तर मध्य प्रदेश येथे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रात मात्र सरकार सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. यापूर्वी आंदाेलनानंतर राज्याचे आरोग्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगत ३१ मार्च २०२३ पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण झाली, त्यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले हाेते. मात्र, अद्याप धाेरणात्मक निर्णय घेतला नाही.
आंदोलन स्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, आयटक राज्य सरचिटणीस श्याम काळे, भाकपचे जिल्हा सचिव अरुण बनकर, जिल्हा परिषद महासंघाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद कातोरे, दिलीप देशपांडे यांनी भेट दिल्याची माहिती वासनिक यांनी दिली. सरकारने तत्काळ समायोजनाबाबत कार्यवाही करून व धोरणात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा, अन्यथा संप अटळ असल्याचे कृती समिती मुख्य मार्गदर्शक दिलीप उटाणे, प्रवीण बोरकर यांनी जाहीर केले आहे. यापुढे १७ ते २३ ऑक्टाेबरपर्यंत असहकार आंदाेलन करणार असल्याचे व २५ ऑक्टाेबरपासून बेमुदत संप करण्याची घाेषणा संघटेनेने केल्याचे वासनिक यांनी सांगितले. यावेळी समन्वयक प्रफुल्ल पोहणे, रेखा टरके, संगीता रेवडे, मीनाक्षी मोरे, सरला परीचे, सुशीला शिंदे अंजली राठोड, पूनम चौधरी, अमिता नागदेवते, लता माहुरे, शेखर सोनटक्के, आदी उपस्थित हाेते.