विवाह टिकण्यासाठी एकमेकांना समजून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:26 AM2017-10-16T00:26:14+5:302017-10-16T00:26:25+5:30
विवाह जीवनभर टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाह जीवनभर टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय माळी महासंघ नागपूरच्या वतीने रविवारी सुभाष रोडवरील गीता मंदिर परिसरात उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष गोविंद वैराळे अध्यक्षस्थानी तर, प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री बानाईत, माजी आमदार अशोक मानकर, शंकर लिंगे, किशोर कन्हेरे प्रमुख अतिथी होते.
अलीकडच्या काळात वैचारिक मतभेदामुळे घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पती-पत्नीमधील सहनशीलता संपत चालली आहे. परिणामी विवाह संस्था बळकट करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे असेदेखील रोही यांनी सांगितले.
अन्य मान्यवरांनीही समुचित मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते ‘शुभमंगल’ या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेत ९५० उपवर-वधूंची माहिती आहे. कविता भोपळे व प्रज्ञा कथलकर यांनी संचालन तर, वसुधा येनकर यांनी आभार व्यक्त केले. रमेश भेदे, मधुसूदन देशमुख, नाना इंगळे, कैलाश जामगडे, सुनीता शाहाकार, वीणा बंड, एस. एन. पाटील, अॅड. राजेंद्र महाडोळे, मधुकर वानखेडे, अरुण पवार, अविनाश ठाकरे, संजय नाथे, रामभाऊ सातव, नीळकंठ राऊत आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.