खासगी रुग्णालयांच्या अडचणी समजून घ्या : विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने दिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:05 AM2020-04-26T01:05:04+5:302020-04-26T01:06:20+5:30
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील काही खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दिले. यावर विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने खासगी रुग्णालयाच्या अडचणी समजून घ्या, अशा आशयाचे सहा पानांचे पत्र दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील काही खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दिले. यावर विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने खासगी रुग्णालयाच्या अडचणी समजून घ्या, अशा आशयाचे सहा पानांचे पत्र दिले. पत्रात म्हटले आहे, अनेक हॉस्पिटलमध्ये आत येण्याचा व बाहेर पडण्याचा स्वतंत्र मार्ग नाही. काहींकडे आयसोलेशन वॉर्ड नाही. ‘पीपीई’ किट उपलब्ध नाहीत. कोरोनाच्या भीतीने आधीच ५० टक्के कर्मचारी कामावर येत नाहीत. ‘कोविड-१९’ रुग्णांच्या सेवेत रुग्णालय सुरू झाल्यास जे येत आहेत यातील किती कर्मचारी येतील, हा प्रश्न आहे. या शिवाय, रुग्णांचा खर्च जीवनदायी आरोग्य योजनेतून करायचे म्हटले तरी फार कमी खर्च रुग्णांमागे दिला आहे. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. परंतु अनेकांजवळ तशा जागा नाही. विशेष म्हणजे, शहरातील बहुसंख्य हॉस्पिटल ही वसाहतीमध्ये आहेत. तिथे कोविडचा रुग्ण आल्यास परिसरातील नागरिकांचा हॉस्पिटलला विरोध होण्याची भीती आहे. जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती आहेत किंवा नेहमीचे रुग्ण उपचारासाठी येणार आहेत त्यांनी कुठे जावे, हा प्रश्न आहे. ‘कोविड-१९’ रुग्ण ठेवण्यासाठी हॉस्पिटलची जी नियमावली आहे, २६ एप्रिलपर्यंत ती पूर्ण करणे अशक्य आहे. हॉस्पिटलमध्ये त्रुटी राहिल्यास आणि संसर्गाचे केंद्र झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. सर्व समस्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असेही पत्रात नमूद आहे. या पत्रावर विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोेक अरबट, सचिव डॉ. अलोक उमरे यांच्या स्वाक्षºया आहेत.
रहिवाशांकडून विरोध
धंतोलीसह अनेक वसाहतींच्या आत खासगी हॉस्पिटल आहेत. येथून ‘कोविड-१९’ रुग्णांवर उपचार सुरू झाल्यास रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सोशल मीडियातून यावर चर्चेला सुरुवात झाली आहे.
मनपा रुग्णालयात कोरोनाचा उपचार का नाही?
महानगरपालिकेची स्वत:ची तीन मोठी रुग्णालये आहेत. ही तिन्ही रुग्णालये मिळून सुमारे १४०वर खाटा आहेत. परंतु येथे दहाच्या आतच रुग्ण राहतात. या रुग्णांची इतरत्र सोय करून १४० खाटांचे ‘कोविड हेल्थ केअर सेंटर’ का केले जात नाही, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.