कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:39+5:302021-07-19T04:07:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : महावितरण कंपनीने थकीत बिलापाेटी काही शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ताे पूर्ववत करण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : महावितरण कंपनीने थकीत बिलापाेटी काही शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ताे पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली.
महावितरण कंपनीने कामठी व माैदा तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडील कृषिपंपांचा वीजपुरवठा वीज बिले न भरल्याने खंडित केला आहे. या शेतकऱ्यांवर कंपनीने ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या वीज बिलाची आकारणी केली आहे. ही रक्कम माेठी असून, खरीप हंगामात शेतकऱ्यांना बिले भरणे शक्य नाही. त्यांनी पैशाची जुळवाजुळव करून पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने पिकांना पाणी देणे अनिवार्य आहे. परंतु, वीजपुरवठा १५ दिवसापूर्वी खंडित करण्यात आल्याने ओलित करण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान हाेत आहे.
प्रशासनाचा हा प्रकार शेतकऱ्यांना वेठीस धरणारा असल्याने पीक वाचविण्यासाठी त्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणीही या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर बेले, रमेश चिकटे, किरण राऊत, विशाल चामट, भरत आंबिलडुके, फुलचंद आंबिलडुके यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांचा समावेश हाेता.