पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:56+5:302021-03-22T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुही : ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गावातील पाणीपुरवठा योजनेचा थकीत वीज बिलापाेटी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गावातील पाणीपुरवठा योजनेचा थकीत वीज बिलापाेटी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे गावागावात पाणीसमस्येला सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी तालुक्यातील सरपंच संघटनेने केली आहे. याबाबत वीज कंपनीच्या अभियंत्यांना सरपंच संघटनेने निवेदन साेपविले आहे.
गेल्या काही वर्षात प्रशासकीय व्यवस्थेनुसार सर्व ग्रामपंचायती पाणी पुरवठ्याची वीज बिले नियमित भरत होती. परंतु २०१८ पासून महावितरणने वीज बिले देणे बंद केले होते. त्यानंतरच्या काळात कोरोनामुळे शासनाच्या निर्देशानुसार आपणाकडून वसुली करणे थांबविले होते. अशात महावितरण कंपनीने मागील दोन वर्षापासूनची बिले एकाचवेळी पाठवून वसुलीचा तगादा लावला आहे. आतापर्यंत १५ ते २० ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची वीज कनेक्शन कापण्यात आले. परंतु डिसेंबर १९ पासून काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे कर वसुली ही अनेक कारणांनी होत नसल्यामुळे ग्रामपंचायतींची स्थिती आर्थिकदृष्ट्या चिंताजनक आहे. आता उन्हाळा सुरू झाला असताना वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवावी व शासन स्तरावर ग्रामपंचायतींना सवलत देऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे गावातील सरपंच, उपसरपंचांनी केली आहे.
ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित केल्यामुळे आता कोरोनासोबत दोन हात करायचे की, पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करायचा, असा प्रश्न सरपंचांनी उपस्थित केला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गावागावात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करावा अन्यथा सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व गावकरी रस्त्यावर उतरून आंदाेलन करतील, असा इशाराही निवेदनातून दिला आहे. सरपंच संघटनेने नायब तहसीलदार उपेश अंबादे, वीज कंपनीचे उपअभियंता रंधये, खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी विविध गावातील सरपंच गजानन धांडे, सुनील सहारे, प्रदीप धनरे, लालाजी दंडारे, भाऊराव फेंडर, जितेंद्र ठवकर, फारुख शेख, राजेश चाफले, धनपाल बडगे, रेखा सोनुने, नेहा ढेंगे, करुणा फुलझले, ज्याेती मेश्राम, अस्मिता भोयर, प्रियंका वैद्य, रेणुका पडोळे, उपसरपंच नत्थू कारेमोरे, अनिश लोखंडे, सुरेश नौकरकर, पंकज देवगडे, सोनु तितरमारे, शुभ्रमणी गेडाम आदी उपस्थित होते.