नागपुरात  बेरोजगार दारुडे आता करताहेत ठकबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:21 PM2020-04-23T23:21:30+5:302020-04-23T23:22:44+5:30

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले दारुडे आता लोकांची ठकबाजी करायला लागले आहेत. असाच एक प्रकार बुधवारी दुपारी बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभ्यंकर नगरात घडला.

Unemployed alcoholics in Nagpur are now cheating | नागपुरात  बेरोजगार दारुडे आता करताहेत ठकबाजी

नागपुरात  बेरोजगार दारुडे आता करताहेत ठकबाजी

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा कर्मचारी असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक : बजाज नगरातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले दारुडे आता लोकांची ठकबाजी करायला लागले आहेत. असाच एक प्रकार बुधवारी दुपारी बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभ्यंकर नगरात घडला. येथे दोन दारुड्यांनी मनपा कर्मचारी असल्याचे सांगून पाण्याचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने एक वृद्ध महिलेकडून दोन हजार रुपये लुबाडले. कमल महेश डकाह (२०) व प्रेम विठ्ठल पन्नागडे (३५) अशी या आरोपींची नावे असून ते लक्ष्मीनगर येथे राहणारे आहेत.
कमल आणि प्रेम दोघेही मजुरी करतात. लॉकडाऊन सुरू असल्याने मागील एक महिन्यापासून ते बेरोजगार आहेत. त्यांना दारूचे व्यसन आहे. शहरात अवैध दारू मिळत असली तरी त्याची किंमत चार ते पाच पटीने वाढली आहे. काम नसल्याने व पैशाची अडचण असल्याने ते दारू विकत घेऊ शकत नव्हते. लॉकडाऊनमुळे वीज आणि पाण्याचे कलेक्शन बंद असल्याचे त्यांना माहीत होते. याचा फायदा घेऊन त्यांनी अभ्यंकर नगरातील ८५ वर्षीय दुर्गा कानगेर या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेला गाठले. त्या एकट्याच राहतात. बुधवारी दुपारी ते कानगेर यांच्या घरी गेले. आपण मनपा कर्मचारी असून पाण्याचे बिल घेण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी दोन हजार रुपये दिले. पावती मागितल्यावर मात्र ते निघून गेले.
हा प्रकार कानगेर यांनी शेजाऱ्यांच्या कानावर टाकला. हा ठकबाजीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर बजाजनगर पोलिसात तक्रार दिली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीचा आधार घेऊन लोकांशी चर्चा केली आणि आरोपींचा शोध लावला. दारू विकत घेण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली.
बजाज नगरात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांकडून त्यांची सेवा सुरू आहे. पोलीस सतत त्यांच्या संपर्कात असतात. यामुळे आरोपींचा शोध घेणे सोपे झाले. अन्य ठिकाणीही अशा घटना घडल्या आहेत. मात्र रक्कम कमी असल्याने बहुतेकांनी तक्रार करण्याचे टाळल्याची माहिती आहे.

Web Title: Unemployed alcoholics in Nagpur are now cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.