नागपुरात बेरोजगार अभियंत्याने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 07:23 PM2020-07-04T19:23:24+5:302020-07-04T19:24:37+5:30
बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका तरुण बेरोजगार अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धांत संजय कडू (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका तरुण बेरोजगार अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धांत संजय कडू (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होता.
बेलतरोडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सधन परिवारातील सदस्य असलेल्या सिद्धांतने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे वडील निवृत्त शासकीय नोकरदार असून बहीण डॉक्टर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार न मिळाल्यामुळे सिद्धांत नैराश्याच्या गर्तेत सापडला होता. त्याची मानसिक अवस्था बिघडल्यामुळे त्याच्यावर रामदासपेठेतील एका मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू होते. या पार्श्वभूमीवर सिद्धांतने गुरुवारी मध्यरात्रीनंतर स्वत:च्या रूममध्ये गळफास लावून घेतला. तत्पूर्वी, त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात आई-वडिलांकडे त्याने क्षमायाचना केली, असे समजते. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास आई-वडील नेहमीप्रमाणे जागे झाले. सिद्धांतच्या रूमकडे बघितले असता त्यांना तो गळफास लावून दिसला. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले आणि सिद्धांतला खाली उतरविले. ओळखीच्या डॉक्टरांना बोलविण्यात आले, त्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे नंतर बेलतरोडी पोलिसांकडे माहिती देण्यात आली. हवालदार वीरेंद्र सवाईथुल यांनी सिद्धांतचे वडील संजय भीमराव कडू यांची तक्रार नोंदवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.