नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:00 AM2019-04-27T01:00:23+5:302019-04-27T01:01:29+5:30
ठिकठिकाणच्या बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची लाखोंची रक्कम हडपणाऱ्या तरुणीला नंदनवन पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठिकठिकाणच्या बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची लाखोंची रक्कम हडपणाऱ्या तरुणीला नंदनवन पोलिसांनी अटक केली. दीप्ती विश्वेश्वर खंडाते (वय २४) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. या फसवणूक प्रकरणात तिच्यासोबत आणखी काही जणांचा समावेश असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असून, पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.
दीप्ती नंदनवन झोपडपट्टीच्या गल्ली नंबर ५ मध्ये राहते. ती आयटीआय झालेली असून, चांगली वाक्पटू आहे. रोजगाराच्या शोधात अनेकांकडे पायपीट करताना केवळ थापेबाजी पदरी पडत असल्याने दीप्तीने स्वत:च दुसऱ्या बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचा गोरखधंदा अवलंबिला. रेल्वे आणि शासनाच्या विविध विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ती बेरोजगारांवर जाळे टाकत होती. प्रारंभी कागदपत्रे ताब्यात घ्यायची नंतर त्यांच्याकडून नियुक्तीच्या प्रक्रियेसाठी जुजबी रक्कम मागायची आणि त्यांची आर्थिक स्थिती लक्षात आल्यानंतर साहेबांना पैसे द्यावे लागते, असे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळायची. तिने विश्वासात घेतलेल्या काही तरुण-तरुणीच्या माध्यमातून गोंदिया येथील दत्तनगरात राहणारा चैतन्य दुलीचंद आंबेडायरे हा तरुण तिच्या जाळ्यात अडकला. त्याला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिने त्याची शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर १७ जानेवारी २०१९ ला चैतन्यकडून चेक तसेच रोखीच्या स्वरूपात दीप्तीने ३ लाख रुपये घेतले. १० मार्चला त्याला नियुक्तीपत्र मिळेल असे दीप्तीने सांगितले होते. मात्र, मार्च आणि एप्रिल महिना जात असून देखील चैतन्यला नियुक्ती मिळाली नसल्याने त्याने तिच्यामागे तगादा लावला. प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगणाऱ्या दीप्तीने नंतर त्याला टाळणे सुरू केले. त्यामुळे चैतन्यने आपली रक्कम तिला परत मागितली. ही रक्कम राजेश सर आणि भीमा नावाच्या आरोपीकडे दिल्याचे सांगून दीप्तीने स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चैतन्य तिच्याकडे पैसे मागायला येत असताना त्याला त्याच्यासारखेच अनेक जण तिच्याकडे चकरा मारताना दिसले. तिने आपलीच नव्हे तर अनेकांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्वांनी गुरुवारी रात्री नंदनवन पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दीप्तीला अटक केली.