नागपुरात अपघातात पोलीस शिपायाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:40 AM2019-04-07T00:40:31+5:302019-04-07T00:41:43+5:30
कर्तव्यावरून घरी परत जात असताना भरधाव वाहन चालकाने धडक दिल्याने एका तरुण पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. विशाल वसंतराव मानकर (वय ३२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्तव्यावरून घरी परत जात असताना भरधाव वाहन चालकाने धडक दिल्याने एका तरुण पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. विशाल वसंतराव मानकर (वय ३२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशाल लकडगंज पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते विनोबा भावेनगरात राहायचे. शुक्रवारी दिवसभर कर्तव्य केल्यानंतर रात्री उशिरा ते आपल्या घराकडे दुचाकीने निघाले. जुना कामठी मार्गावरील रतन टॉवरसमोर त्यांच्या पल्सरला एका वाहनचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. पहाटे २ ची वेळ असल्याने या भागात वर्दळ नव्हती. त्यामुळे जखमी अवस्थेत विशाल बराच वेळ पडून राहिले. त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही. दरम्यान, गस्तीवरील पोलिसांचे वाहन तेथून जात असताना त्यांना विशाल तेथे पडून दिसले. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस कर्मचारी नामदेव सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.