पुतळे पाडण्याच्या घटना दुर्दैवी : संघाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 08:13 PM2018-03-08T20:13:02+5:302018-03-08T20:49:17+5:30
त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मांडण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मांडण्यात आली आहे. शुक्रवारपासून नागपूर येथील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान माहिती देताना संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी यासंदर्भात वक्तव्य केले.
संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ९ ते ११ मार्च या कालावधीत चालणार आहे. या सभेत संघ परिवारातील विविध संघटनांतील सुमारे १५०० पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यात विभाग प्रचार, संघाच्या सहा कार्यविभागातील पदाधिकारी, प्रांत संघचालक, कार्यवाह, प्रांत प्रचारक, अखिल भारतीय पदाधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. याचप्रमाणे विविघ संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोखा संक्षिप्तपणे मांडतील. संघाची पुढील तीन वर्षांत कार्याची दिशा नेमकी काय असेल, यावर यात चर्चा होणार आहे; सोबतच संघकार्य विस्तारासंदर्भातील मुद्यांवरदेखील या सभेत मंथन होईल, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
१० तारखेला सरकार्यवाहपदाची निवडणूक
या प्रतिनिधी सभेत संघातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद मानण्यात येणाऱ्या सरकार्यवाहपदाची निवड होणार आहे. वर्तमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची फेरनिवड होते की सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्णगोपाल, भागय्या व सुरेश सोनी यांच्यापैकी एकाला संधी मिळते, याकडे संघवर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘नवनियुक्त’ सरकार्यवाहांची निवड १० मार्च रोजी होणार आहे.
अमित शहा होणार सहभागी
अ.भा.प्रतिनिधी सभेत भाजपचे पदाधिकारीदेखील उपस्थित असतात. मागील वेळेप्रमाणो यंदादेखील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संघटनमंत्री रामलाल, राम माधव हे सहभागी होतील. अमित शहा नेमके कधी येतील, ते आम्हाला माहीत नाही, असे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.
तरुणांना संघात जोडण्यावर भर
गेल्या काही काळापासून संघाशी मोठय़ा प्रमाणात लोक जुळत आहेत. विशेषत: ‘जॉईन आरएसएस’च्या माध्यमातून जुळणा:या २० ते३५ या वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. मेरठ येथे नुकताच राष्ट्रोदय नावाचा कार्यक्रम झाला. १९९८ साली अशाच कार्यक्रमाला२० हजार स्वयंसेवक आले होते. यंदा ही संख्या १ लाख ४५ हजारांवर पोहोचली. याशिवाय महाराष्ट्रातील कोकण प्रांत, देवगिरी प्रांत, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या कार्यक्रमांमध्येदेखील मोठय़ा प्रमाणात स्वयंसेवक सहभागी झाले होते. संघात बाल स्वयंसेवक तसेच महाविद्यालयीन विद्याथ्र्याची संख्या वाढावी, यासाठी नियोजनावर सभेत चर्चा होईल. तसेच संघ विस्तार व बळकटीवरणावरदेखील सखोल मंथन होईल, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
सामाजिक समरसतेकडे आणखी एक पाऊल
२०१५ साली झालेल्या अ.भा. प्रतिनिधी सभेत संघाने सामाजिक समरसतेसंदर्भातील प्रस्ताव संमत केला होता. संघाचे सामाजिक समरसतेवर कार्य सुरू असून, समाजामध्ये सामाजिक सद्भाव बैठका वाढविण्याचा प्रयत्न आहे. याला बळकटी देण्यात येईल. या बैठकांमुळे जातीगत विद्वेष दूर होईल, असा विश्वास डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केला.