धक्कादायक... होडी पलटल्याने 11 जण नदीत बुडाले, तिघांचे मृतदेह हाती लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:35 PM2021-09-14T13:35:36+5:302021-09-14T17:36:58+5:30
नरखेड तालुक्यातील झुंज येथे फिरायला आलेले तारासावगा, गाडेगाव, हातूर्णा येथील भाविक होडीत बसले असता होडी पलटी झाल्यामुळे 11 जण नदीत बुडाले.
नागपूर/अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील झुंज येथे वरुड तालुक्यातील गडेगाव येथील ११ जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. बेनोडा पोलीस स्टेशन ( जि. अमरावती) च्या हद्दीत आज मंगळवार आज सकाळी 11.45 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 11 जण दशक्रियेच्या विधीसाठी गाडेगावातील मटरे कुटुंबीयांकडे आले होते. दशक्रियेचा विधी आटोपल्यानंतर आज सकाळी नरखेड तालुक्यातील झुंज येथे फिरायला गेले. वर्धा नदीच्या पाण्यातून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी होडीतून प्रवास करत होते. त्यावेळी, होडी पलटी झाल्यामुळे 11 जण नदीत बुडाले. त्यात महिलांचासुद्धा समावेश आहे. त्यातील तिघांचा मृतदेह सापडला असून बाकीच्यांचा शोध घेणे सुरू आहे. हाती लागलेल्या मृतदेहांमध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा मृतदेह आहे. तर, होडीतून बहिण, भावांसह आणि जावईही बसले होते. घटनास्थळी वरुड, बेनोडा हातूर्णा वरुड, जलालखेडा पोलीस दाखल झाले असून स्थानिकांनीही धाव घेतली आहे.