दुर्दैवी! आईच्या शोधात चिमुकल्याचा गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 07:40 PM2022-06-24T19:40:41+5:302022-06-24T19:43:18+5:30
Nagpur News आई कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी तिच्या मागोमाग अडीच वर्षांचा चिमुकला घराच्या सभोवताली जाऊन बघत असतानाच सेप्टिक टँकमध्ये पडला व टँकमध्येच त्याचा मृत्यू झाला.
नागपूर : घरातील केरकचरा फेकण्यासाठी आई घराबाहेर गेली. अशातच आई कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी तिच्या मागोमाग अडीच वर्षांचा चिमुकला घराच्या सभोवताली जाऊन बघत असतानाच सेप्टिक टँकमध्ये पडला व टँकमध्येच त्याचा मृत्यू झाला. सक्षम साधुराम जांगडा (रा. कवारी, हरयाणा) असे या चिमुकल्याचे नाव आहे. हृदय हेलावून टाकणारी ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
मूळ हरयाणा राज्यातील कवारी गावातील निलम साधुराम जांगडा ही महिला बीपीएडच्या परीक्षेसाठी भाऊ दीपक जांगडा आणि मुलासह तीन दिवसांपूर्वीच (२१ जूनला) उमरेड येथे आली. रेवतकर ले- आऊट विकास कॉलनी येथील राजेश्वर मैदमवार यांच्याकडे तिघेही किरायाच्या खोलीत वास्तव्यास होते.
सकाळी ९ वाजताच्या सुमारास सक्षमची आई निलम केरकचरा फेकण्यासाठी बाहेर गेली. गेटबाहेर रस्ता ओलांडून परत येत नाही, तोच सक्षम दिसेनासा झाला. एक-दोन मिनिटांतच मुलगा असा अचानक गायब झाल्यामुळे ती अस्वस्थ झाली. आरडाओरडा केला, शोधाशोध सुरू झाला. सोशल मीडियावरही मुलगा हरवल्याचे मॅसेज सेंड झाले.
लागलीच पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. आधी संपूर्ण परिसर शोधून काढत असताना घराच्या गल्लीत असलेल्या सेप्टिक टँकवरील पाट्या अस्ताव्यस्त दिसल्या. मुलगा या टँकमध्ये पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी घेतला. यानंतर टँकमधील घाण बाहेर काढण्यात आली. टँकमध्ये चिमुकला सक्षम मृतावस्थेत आढळून आला.
अन् सारेच गहिवरले
मुलगा हरवला, अशा भ्रमात आई निलम होती. सेप्टिक टँकमधील घाण बाहेर काढत असताना ती शेजारी अश्रू ढाळत बसली होती. पोलिसांना मुलाचे प्रेत दिसून आले. अशातच ती ‘माझा मुलगा कधी मिळणार?’ अशी आर्त हाक घेत पोलिसांना विचारू लागली. मुलगा याच ठिकाणी मृत्युमुखी पडल्याचे लक्षात येताच ती धाय मोकलून रडू लागली.
हरयाणाकडे रवाना
मृतकाचे वडील साधुराम जांगडा हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हरयाणा येथून उमरेडला येणार होते. दुसरीकडे उमरेड ग्रामीण रुग्णालयात सक्षमचे शवविच्छेदन केल्या गेले. पती पोहोचल्यानंतर जांगडा कुटुंबीय हरयाणाला आपल्या गावी रवाना झालेत.