अपघातात अनियंत्रित कार चालकाचा मृत्यू, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:04 AM2019-05-31T01:04:56+5:302019-05-31T01:05:51+5:30
हुडकेश्वर येथील पिपळा फाटा आऊटर रिंगरोडवर बुधवारी रात्री एका भरधाव अनियंत्रित कार चालकाने बाईकस्वार कुटुंबाला धडक दिल्यानंतर सिमेंट रोडला गाडी धडकली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला तर बाईकस्वार जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वर येथील पिपळा फाटा आऊटर रिंगरोडवर बुधवारी रात्री एका भरधाव अनियंत्रित कार चालकाने बाईकस्वार कुटुंबाला धडक दिल्यानंतर सिमेंट रोडला गाडी धडकली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला तर बाईकस्वार जखमी झाले.
दिनेश सुरेश मंत्री (३२) रा. आझादनगर भंडारा असे मृत कार चालकाचे नाव आहे. तर राहुल सुरेश अडकुले (३६), त्यांची पत्नी राणी अडकुले (२८) आणि ७ वर्षीय मुलगी पूर्वी अशी जखमींची नावे आहेत.
राहुल अडकुले हे खरबी रोड येथे राहतात. ते पत्नी व मुलीला घेऊन बाईकने आऊटर रिंगरोड येथील सेलिब्रेशन लॉनमध्ये लग्नसमारंभाला गेले होते. रात्री ११ वाजता ते बाईकने घरी परत जात होते. यादरम्यान पिपळा फाट्याजवळ रिंगरोडकडे जाणारी एमएच/३६/एच/५२७१ क्रमांकाची स्वीफ्ट कार भरधाव वेगाने येत होती. तिने सुरुवातीला बाईकला धडक दिली. यानंतर अनियंत्रित कार सिमेट रोडला जाऊन धडकली. यात कार चालक दिनेश बेशुद्ध झाला. पोलिसांनी दिनेशला रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.