अनोळखी व्यक्तीचा खून
By admin | Published: March 31, 2016 03:18 AM2016-03-31T03:18:49+5:302016-03-31T03:18:49+5:30
परिसरातील हुडपा शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचा अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला.
हुडपा शिवारात आढळला जळालेला मृतदेह
साळवा : परिसरातील हुडपा शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचा अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला. बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
कुही पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या साळवा लगतच्या हुडपा शिवारात एका शेतात सदर मृतदेह आढळला. या शिवारातील शेतकरी नामदेव बुराडे हे बैल चारण्याकरिता गेले होते. दरम्यान, बैल चारा खात असलेल्या ठिकाणी ते गेले असता, सदर मृतदेह आढळून आला. लागलीच त्यांनी गावात जाऊन कुही पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मुलगीर पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी कुही पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले होते. सदर मृत व्यक्तीचे अंदाजे वय २० ते २५ वर्षे आहे.
प्रथमदर्शनी मृतदेह अर्धवट स्थितीत जळालेला असल्याने अज्ञात आरोपीने त्याचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. (वार्ताहर)