कर्नाटकातील बेपत्ता विद्यार्थी नागपुरात सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 03:23 AM2016-03-12T03:23:58+5:302016-03-12T03:23:58+5:30
बंगळुरु जवळच्या मल्लेश्वरम पॅलेस (गुठल्ली नागप्पा स्टेट) मधून पाच दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेला ...
नागपूर : बंगळुरु जवळच्या मल्लेश्वरम पॅलेस (गुठल्ली नागप्पा स्टेट) मधून पाच दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेला १५ वर्षीय विद्यार्थी नागपुरात सापडला. मुकेश बाबूलाल चौधरी असे त्याचे नाव असून, तो ९ वीचा विद्यार्थी आहे.
शुक्रवारी दुपारी रिझर्व्ह बँक चौकात तो कावराबावरा होऊन फिरत होता. ते पाहून एका सद्गृहस्थाने त्याची चौकशी केली. बोलेरोमधील काही जणांनी आपले अपहरण केल्याचे मुकेशने त्या व्यक्तीला सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीने नियंत्रण कक्षात फोन केला. ही माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठवून मुकेशला पोलीस ठाण्यात आणले. त्याला जेवण दिल्यानंतर त्याची विचारपूस करून त्याच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला. ६ मार्चला मुकेश अचानक बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी वय्याली पोलीस ठाण्यात मुकेशच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. चौधरी परिवार आणि पोलीस मुकेशचा शोध घेत असतानाच त्यांना मुकेश नागपुरात सुखरूप असल्याची माहिती ठाणेदार बंडीवार यांनी कळविली. इकडे मुकेशने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, ६ मार्चला त्याचे बोलेरोमधील काही जणांनी अपहरण केले. जीवे मारण्याचा धाक दाखवून त्याला कथित आरोपींनी पळवून आणले. आज दुपारी ते नागपुरात पोहचले. संधी मिळताच रिझर्व्ह बँक चौकात मुकेशने बोलेरोतून उडी मारली. (प्रतिनिधी)