रेल्वे रुळाची गिट्टी समांतर करण्यासाठी ‘युनिमॅट’ यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 01:56 PM2021-03-04T13:56:04+5:302021-03-04T13:57:27+5:30
Nagpur News रेल्वे रुळाची गिट्टी समांतर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ‘युनिमॅट’ नावाचे यंत्र आले आहे. यामुळे रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजृला गिट्टी पसरविणे आणि गिट्टी समांतर करण्याच्या कामात गती आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे रुळाची गिट्टी समांतर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ‘युनिमॅट’ नावाचे यंत्र आले आहे. यामुळे रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजृला गिट्टी पसरविणे आणि गिट्टी समांतर करण्याच्या कामात गती आली आहे.
भारतीय रेल्वेत नवे रेल्वेमार्ग तयार होत आहेत. रेल्वेमार्गाला मजबुती देण्यासाठी रुळाला चाव्या असतात. यासोबत दोन्ही बाजूंनी गिट्टी असते. ‘युनिमॅट’ यंत्राच्या मदतीने रुळाच्या शेजारी गिट्टी पसरविली जाते. तसेच ती गिट्टी समांतर करण्यात येते. गिट्टीमुळे रुळाखालील आणि शेजारील जमीन टणक राहते. आधी रेल्वे कर्मचारी गिट्टी पसरविण्याचे काम करीत होते. परंतु आता देशभरात शेकडो किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग तयार होत असल्यामुळे यंत्राची गरज भासत आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने युनिमॅट नावाचे यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या मदतीने गिट्टी पसरविणे, समांतर करण्यास मदत होते. कमी वेळेत अधिक आणि सुरक्षित काम या यंत्रामुळे होत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन तयार करण्यासाठी या यंत्राची मदत होत आहे. तसेच चिचोंडा परिसरात तयार होत असलेल्या थर्ड लाईनच्या कामात गिट्टी पसरविणे आणि समांतर करण्यास या यंत्रामुळे मदत झाली आहे. सोमवारी युनिमॅट हे यंत्र नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. काही वेळानंतर हे यंत्र चिचोंडा रेल्वेस्थानक परिसरात म्हणजे थर्ड लाईन तयार होत असलेल्या ठिकाणी रवाना करण्यात आले. या यंत्राला विविध भाग असून हे यंत्र तंत्रज्ञांमार्फत चालविले जाते. या मशीनवर एकाच वेळी १९ कर्मचारी काम करतात. विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या या यंत्रामुळे काही क्षणातच रेल्वे रुळाशेजारील गिट्टी समांतर करता येते. या यंत्रामुळे नागपूर विभागात रेल्वे रुळांच्या देखभालीच्या कामात गती येणार आहे.
रेल्वे रुळाची देखभाल गतीने होईल
‘युनिमॅट यंत्राच्या माध्यमातून रेल्वे रुळाच्या शेजारी गिट्टी पसरविणे आणि समांतर करण्याचे काम करण्यात येते. त्यामुळे विभागात रेल्वे रुळाची देखभाल करण्याच्या कामात गती येणार आहे.’
-कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नागपूर विभाग
...........