कोरोना लसीकरण केंद्रासाठी अखंडित वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:12+5:302021-01-15T04:09:12+5:30
नागपूर : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात शनिवार १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे ...
नागपूर : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात शनिवार १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिले असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असेही स्पष्ट केले आहे.
नागपूर शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत ८, ग्रामीण भागात १० आणि वर्धा जिल्ह्यात ४ कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही २ ते ८ या तापमानात शीतगृहात ठेवण्यात येते. यासाठी अखंडित वीजपुरवठा राहणे गरजेचे आहे. सर्व लसीकरण केंद्रावर अखंडित वीजपुरवठा ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महावितरणला करण्यात आली होती. यानुसार मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, डॉ. सुरेश वानखेडे, अमित पराजंपे यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला आणि लसीकरण केंद्रावर १५ जानेवारीपासून अखंडित वीजपुरवठा सुरू राहील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.