रेशीमबागेत संघ-भाजप समन्वय बैठक, उपमुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षदेखील उपस्थित
By योगेश पांडे | Published: January 15, 2024 12:42 PM2024-01-15T12:42:38+5:302024-01-15T12:43:41+5:30
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आयोजित बैठकीला लावली हजेरी
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात संघ व भाजप पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.
संघ परिवारातील सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नियमितपणे समन्वय बैठक आयोजित करण्यात येते. भाजप व संघाच्या पदाधिकाऱ्यांचीदेखील बैठक नियमितपणे होत असते. मात्र आता काही महिन्यांवर आलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यात जल्लोष करत वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने संघ-विहिंप व भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यापक गृहसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवरदेखील बैठकीत मंथन होत आहे. लोकसभा निवडणूकांअगोदरची ही अखेरची नियमित समन्वय बैठक आहे हे विशेष. संघाकडून या बैठकीला प्रांत व क्षेत्राचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत संघटनेचा आढावादेखील घेण्यात येत आहे.