केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात; उद्या ‘लोकमत’च्या कार्यक्रमात मुख्य अतिथी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:26 AM2023-02-17T10:26:12+5:302023-02-17T10:30:31+5:30
लोकमत नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी उद्या शुक्रमवारी सायंकाळी नागपूरमध्ये दाखल होत आहेत. शनिवारी ते नागपूरवरून पुण्याला रवाना होतील आणि तेथून रविवारी कोल्हापूरला जातील. त्यांचे शुक्रवारी रात्री ७.४५ वाजता विशेष विमानाने नागपुरात आगमन होणार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी, १८ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ते मुख्य अतिथी असतील. तत्पूर्वी सकाळी ते दीक्षाभूमी तसेच रेशीमबागेतील हेडगेवार समृतिमंदिराला भेट देतील.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी असतील.
या समारंभात ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘सुवर्णमुद्रा’ विशेषांकाचे, तसेच ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावरील ‘बाबूजी’ या पुस्तकाचे प्रकाशन, ‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त टपाल खात्याने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण होईल. ‘लोकमत’ने तयार केलेले नागपूर गीत (ॲन्थम) गृहमंत्री अमित शाह हे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करतील.
दरम्यान, अमित शाह यांचा नागपूर दौरा लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. विमानतळापासून ते त्यांचे मुक्कामस्थळ तसेच कार्यक्रमस्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात राहणार आहे. याशिवाय वाहतुकीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी दिवसभर यासंदर्भात बैठका चालल्या व सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज येणार
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील शुक्रवारीच नागपुरात येणार आहेत. मुख्यमंत्री हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील व तेथेच गृहमंत्र्यांचे ते स्वागत करण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्रीदेखील सकाळी नागपुरात पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.