केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नागपूरवरील प्रेमाची पावती
By नरेश डोंगरे | Published: February 18, 2023 10:33 AM2023-02-18T10:33:21+5:302023-02-18T10:34:23+5:30
अवघ्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा नागपूर व्हिजिट करणारे एकमेव गृहमंत्री
नरेश डोंगरे
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत तिसऱ्यांदा नागपुरात येऊन नागपूरवरील त्यांच्या प्रेमाची पुन्हा एकदा पावती दिली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या दशकात सर्वाधिक नागपूर व्हिजिट करणारे ते एकमेव केंद्रीय गृहमंत्री ठरले आहेत.
झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून लाैकिक असणाऱ्या आणि देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात मोठमोठ्या नेत्यांची नेहमीच वर्दळ असते. विविध वैशिष्ट्ये जपणारे शहर म्हणूनही मोठमोठी मंडळी नागपूरच्या प्रेमात पडलेली आहेत. त्याचमुळे दिल्ली, मुंबईनंतर सर्वाधिक व्हीव्हीआयपींची नागपुरात ये-जा सुरू असते. देशाचे गृहमंत्रीही त्याला अपवाद नाहीत. यापूर्वी गृहमंत्री असताना राजनाथ सिंह यांनी नागपूर येथे १४ मे २०१५ आणि ४ डिसेंबर २०१६ ला भेट दिली आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गेल्या तीन वर्षांतील ही तिसरी भेट आहे.
सर्वप्रथम ते ११ ऑक्टोबर २०१९ ला नागपूरला आले होते. ही त्यांची नागपूरची पहिली धावती भेट होती. कारण त्यांचे त्यावेळी मेळघाट (अमरावती) येथे कार्यक्रम असल्यामुळे ते नागपूर विमानतळावर आले होते. येथून कार्यक्रमस्थळी गेल्यानंतर पुन्हा विमानतळावर परतले अन् सरळ दिल्लीला रवाना झाले.
२ जानेवारी २०२० रोजी गृहमंत्री शाह येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नागपुरात आले होते. त्यानंतर आता शनिवारी १८ फेब्रुवारीला ते पुन्हा येथे येत आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे तसेच लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी येथे महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून गृहमंत्री शाह उपस्थित राहणार आहेत. अशाप्रकारे त्यांची तीन वर्षांतील ही तिसरी व्हिजिट ठरणार आहे.