केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार विदर्भातील जागांचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:55 AM2024-09-19T10:55:26+5:302024-09-19T10:56:15+5:30
कोअर कमिटीसोबत संवाद साधण्याची शक्यता : २३ सप्टेंबरला नागपूर दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नियोजनाला सुरुवात झाली असून, बूथ पातळीपर्यंतची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यासह विदर्भात महायुतीला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे पक्षाकडून विशेष पावले उचलण्यात येत आहेत. याअंतर्गतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः नागपुरात येऊन विदर्भातील जागांचा आढावा घेणार असून, ते २३ सप्टेंबर रोजी कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत संवाददेखील साधण्याची शक्यता असल्याची माहिती पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपचे वरिष्ठ नेते व मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय हे संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत. त्यांनी शहरातील सहा व जिल्ह्यातील सहा, अशा बारा जागांवरील तयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या नियोजनाबाबत त्यांच्याच उपस्थितीत विजयवर्गीय यांनी जाणून घेतले होते. केंद्रीय नेतृत्वाने नागपूर जिल्ह्यावर विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. याअंतर्गतच आता अमित शाह हे स्वतः नागपुरात येणार आहेत.
यावेळी ते जिल्ह्यातील बाराही जागांचा आढावा घेतील. तसेच ते विदर्भातील जागांबाबतदेखील सखोल आढावा घेणार आहेत. जिल्हा व ग्रामीणच्या कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत ते संवाद साधतील अशी अपेक्षा आहे. याबाबत बुधवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्टता देण्यात आली. २३ सप्टेंबर रोजी अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक कुठे आयोजित करायची याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडून दोन ते तीन विविध पर्यायांचा विचार सुरू आहे सध्या केवळ अमित शाह यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली असून, आढावा बैठकीचे स्वरूप दोन दिवसांत अंतिम होईल, अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार का?
विदर्भातील काही मतदारसंघात भाजपच्याच आजी किंवा माजी आमदारांमध्ये तिकिटासाठी चढाओढ सुरू आहे. पक्षात कुठलाही असंतोष नको व गटबाजी नको, असे केंद्रीय नेतृत्वाने २ अगोदरच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह अशा इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार का, याबाबत अद्याप भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना करण्यात आलेल्या नाहीत.