केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो नव्या वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:07 AM2021-03-31T04:07:39+5:302021-03-31T04:07:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता - केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो हे एका नव्या वादात सापडले आहेत. टॉलीगंज विधानसभेच्या जागेवरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता - केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो हे एका नव्या वादात सापडले आहेत. टॉलीगंज विधानसभेच्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुप्रियो यांनी पक्षाच्या कार्यालयातच एका व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाला असून, भाजपकडून असे झालेच नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असूनदेखील सुप्रियो यांना राज्याच्या राजकारणात परत आणले आहे. पक्षाच्या कार्यालयात नेते व कार्यकर्ते यांचा संवाद सुरूच असतो. राणीकोठी येथील पक्ष कार्यालयात डोलजत्रा उत्सव सुरू असताना, एका व्यक्तीने सुप्रियो यांना टीव्हीवर मुलाखती देण्याऐवजी प्रत्यक्ष तळागाळात जाऊन प्रचार करण्यावर भर द्यावा, असा सल्ला दिला. ते ऐकून सुप्रियो यांचा पारा चढला व त्यांनी संबंधित युवकाच्या कानशिलात लगावली असे व्हिडीओत दिसत आहे. हे प्रकरण अंगलट येऊ शकते व नवा वाद निर्माण होऊ शकताे म्हणून सुप्रियो यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली. मी केवळ मारण्याचा दिखावा करत होतो. प्रत्यक्ष त्याच्या कानशिलातवगैरे लगावलेली नाही, असे सुप्रियो यांनी सांगितले. तर दुसरीकडे पक्ष प्रवक्ते कुणाल घोष यांनीदेखील असे काही झाले असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. बाबुल सुप्रियो यांनी त्याला केवळ हात लावला. त्याला मारण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. संंबंधित व्यक्ती तृणमूलशी संबंधित होता की पक्षातील कुणी बिभिषण होता, याची चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले.