मंत्री, आमदारांना संघ देणार ‘बौद्धिक’

By admin | Published: December 11, 2015 03:31 AM2015-12-11T03:31:41+5:302015-12-11T03:31:41+5:30

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे.

Union, MLAs will give 'intellectual' | मंत्री, आमदारांना संघ देणार ‘बौद्धिक’

मंत्री, आमदारांना संघ देणार ‘बौद्धिक’

Next

१७ डिसेंबरचा मुहूर्त : मुख्यमंत्री होणार सहभागी
योगेश पांडे नागपूर
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. १७ डिसेंबर रोजी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहतील अशी माहिती मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली.

मागील वर्षी संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत बौद्धिक देण्यात आले होते. परंतु त्यावेळी सरसंघचालकांसोबत आमदारांची भेट होऊ शकली नव्हती. यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार तीन आठवडे नागपुरात आले आहेत. त्यामुळे संघभूमीत परत येत असताना सरसंघचालकांचे मार्गदर्शन मिळावे अशी अनेकांची इच्छा होती. यंदा संघाकडून उद्बोधन वर्गाचे आयोजन होणार की नाही, याबाबत आमदारांमध्ये संभ्रम होता. परंतु १७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास या वर्गाचे आयोजन संघाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतील व त्यानंतर सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

मार्गदर्शन कोण करणार याबाबत गुप्तता
दरम्यान, या उद्बोधन वर्गात संघाकडून नेमके कोण मार्गदर्शन करणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. मागील वर्षी माजी महानगर संघचालक डॉ.दिलीप गुप्ता यांनी मार्गदर्शन केले होते. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे सध्या नागपुरातच आहेत. त्यामुळे संघाचे जेष्ठ पदाधिकारी हा वर्ग घेतील की स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोरच मंत्री-आमदार उपस्थित राहतील याबाबतीत संघाकडून मौन साधण्यात आले आहे.
संघ विचार आणि अपेक्षांवर राहणार भर
भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. शिवाय विविध घटनांमुळे मंत्र्यांवर ताशेरेदेखील ओढण्यात येत आहेत. जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनताहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, यावर उद्बोधन वर्गाचा भर राहणार आहे. शिवाय संघाची विचारधारा आणि अपेक्षा याबाबतदेखील ‘बौद्धिक’ देण्यात येईल, अशी महिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Union, MLAs will give 'intellectual'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.