आकाश आणि धरणीचे मीलन म्हणजे राम जानकी विवाह; जगद्गुरू रामानुजाचार्य अनंतचार्य महाराज
By जितेंद्र ढवळे | Published: January 19, 2024 07:26 PM2024-01-19T19:26:37+5:302024-01-19T19:26:48+5:30
महाराज म्हणाले, मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला होता.
नागपूर: आकाश आणि धरणीचे मीलन म्हणजे राम जानकी विवाह. भगवान श्रीरामांचा मिथीलानरेश सीतेशी विवाह झाला होता. सीता ही भूमिकन्या होती आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार होते. श्रीराम जानकी विवाह म्हणजे पावित्र्य, सत्यता, प्रेम आणि विश्वास याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानुजाचार्य अंनतचार्य महाराज यांनी केले. मारोती देवस्थान ट्रस्ट आणि श्रीराम सेवा समितीद्वारे आयोजित संगीतमय रामकथेचे आयोजन अयोध्या धाम, लेंड्रा पार्क, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी रामकथेच्या चौथ्या दिवशी राम जानकी विवाह विषयावर प्रवचन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाराज म्हणाले, मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला होता. जनकाने आपल्या सर्व कन्या उर्मिला, श्रृतकीर्ती आणि मांडवी या अनुक्रमे लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांना दिल्या. हिंदू शास्त्रानुसार विवाह हा संस्कार आहे. तो केवळ शारीरिक मिलन नसून दोन आत्म्याचे मीलन आहे. विवाह संस्कारामुळे नात्यामध्ये दृढता, सुख शांती, कुलवृद्धी होते. श्रीराम जानकी विवाहाच्या कथा ऐकल्यामुळे नात्यांमध्ये माधुर्य, एकता निर्माण होते. तरुण-तरुणींनी राम जानकीच्या कथा ऐकल्या तर त्यांचे वैवाहिक जीवन सफल आणि समृद्ध होते. रामायणानुसार श्रीराम हे मर्यादा पुरुष तर सीता ही आदिशक्ती आहे. सीतारूपी शक्ती जवळ होती म्हणून श्रीरामांना रावणाचा वध करता आला, असे रामायण सांगते, असेही अनंतचार्य महाराज यांनी सांगितले.