संघ लोकसेवा आयोग : नागपूरचे निखिल दुबे यांना ७३३ वी रॅँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:33 PM2020-08-04T22:33:47+5:302020-08-04T22:35:15+5:30
संघ लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी २०१९ परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये नागपूरचे निखिल सुधाकर दुबे यांनी ७३३ व्या एआयआर रॅँकिंगसह यश मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघ लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी २०१९ परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये नागपूरचे निखिल सुधाकर दुबे यांनी ७३३ व्या एआयआर रॅँकिंगसह यश मिळविले. विशेष म्हणजे हे यश त्यांनी दुसऱ्यांदा प्राप्त केले आहे. २०१८ मध्ये यूपीएससी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना भारतीय माहिती सेवा, दिल्ली येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू होते आणि यावेळी त्यापेक्षा वरच्या रॅँकने ते उत्तीर्ण झाले आहेत.
निखिल दुबे दहावीपर्यंत सेंटर पॉईंट तर १२ वी शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. त्यानंतर बीआयटी, रांची येथून अभियांत्रिकी व दिल्लीमधून एमबीए पूर्ण केले आहे. काही दिवस खासगी नोकरी केल्यानंतर २०१५ पासून यूपीएससीची तयारी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे वडील सुधाकर दुबे हे फिशरी विभागातून सहायक आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. वडिलांकडूनच यूपीएससीची प्रेरणा घेतल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवस त्यांनी नागपूरच्या प्रशासकीय सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण केंद्रात अभ्यास चालविला होता. त्यानंतर काही दिवस पुण्यात राहून तयारी केली. २०१८ मध्ये यशस्वी झाल्यानंतर दिल्ली येथे माहिती विभागात त्यांना पद मिळाले होते व त्याच ठिकाणी प्रशिक्षण घेताना त्यांना दुसऱ्यांदा यश मिळाले.
यूपीएससी सारख्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी परीक्षा केंद्रीत स्मार्ट स्टडी गरजेची असल्याचे मत निखिल यांनी व्यक्त केले. रट्टा मारण्यापेक्षा समजून अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आवडत्या विषयात जास्त वेळ घालविण्यापेक्षा सर्व विषय कव्हर होतील, हे महत्त्वाचे आहे. कुठल्याही विषयावर इतरांशी चर्चा करण्यास व यशस्वी झालेल्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात संकोच बाळगू नये. तणाव घेऊ नका आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम ठेवा, असे आवाहन निखिल दुबे यांनी केले.