राष्ट्रसेविका समितीसाठी अनोखा योगायोग : तिथी व तारखेचा संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 09:17 PM2020-10-23T21:17:53+5:302020-10-23T21:19:46+5:30
Rashtrasevika Samiti, Nagpur news कोरोनाचे सावट अद्यापही कायम असले तरी राष्ट्रसेविका समितीसाठी यंदाचा विजयादशमी उत्सव विशेष ठरणार आहे. १९३६ सालप्रमाणेच तिथी, तारीख व दिवसाचा योगायोग घडून येणार आहे. त्यामुळे उत्सवासंदर्भात विशेष उत्सुकता लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे सावट अद्यापही कायम असले तरी राष्ट्रसेविका समितीसाठी यंदाचा विजयादशमी उत्सव विशेष ठरणार आहे. १९३६ सालप्रमाणेच तिथी, तारीख व दिवसाचा योगायोग घडून येणार आहे. त्यामुळे उत्सवासंदर्भात विशेष उत्सुकता लागली आहे.
एरवी राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या अगोदर होतो. मात्र यंदा विजयादशमीच्या मुहूर्तावरच हे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता ‘व्हर्च्युअल’ माध्यमातून प्रमुख संचालिका शांताक्का यांचे भाषण होणार आहे. यंदा प्रत्यक्ष सोहळा नसला तरी समितीमध्ये तयारी जोरात सुरू आहे. २५ ऑक्टोबर १९३६ साली लक्ष्मीबाई केळकर यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या मार्गदर्शनात वर्धा येथे राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली होती व तेथेच पहिली शाखा सुरू झाली होती. आज समितीचे काम देशभरात असून विविध उपक्रम चालविले जात आहे. ज्या दिवशी समितीची स्थापना झाली तो रविवार होता व विजयादशमीचा मुहूर्त होता. ८४ वर्षांनंतर समितीसाठी विजयादशमी उत्सव व तारखेने स्थापना दिवस सोबतच येत आहे. विशेष म्हणजे यंदादेखील २५ ऑक्टोबर रोजी रविवारच आला आहे.