संगीत, नृत्याचा अनोखा संगम

By admin | Published: January 13, 2015 01:07 AM2015-01-13T01:07:12+5:302015-01-13T01:07:12+5:30

पारंपरिक शास्त्रीय नृत्य, रागांचे शास्त्रीय संगीत ते सिनेसंगीतापासून थेट रॉक बॅण्ड एकत्र अनुभवण्याचा ‘उडान अ म्युझिकल इव्ह’ हा कार्यक्रम राष्ट्र निर्माण संघटनेच्या वतीने स्वामी विवेकानंद

The unique combination of music, dance | संगीत, नृत्याचा अनोखा संगम

संगीत, नृत्याचा अनोखा संगम

Next

उडान : अ म्युझिकल फ्युजन इव्ह
नागपूर : पारंपरिक शास्त्रीय नृत्य, रागांचे शास्त्रीय संगीत ते सिनेसंगीतापासून थेट रॉक बॅण्ड एकत्र अनुभवण्याचा ‘उडान अ म्युझिकल इव्ह’ हा कार्यक्रम राष्ट्र निर्माण संघटनेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्र निर्माण संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्थानिक कलावंतांसह मुंबई-पुणे येथील कलावंतांच्या सादरीकरणाचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांनी अनुभवला.
भरतनाट्यम्, क थ्थक या शास्त्रीय नृत्याची जुगलबंदी, अहीर भैरव, पिलू व पुरिया धनश्री या रागांनी मन प्रसन्न करणाऱ्या शास्त्रीय संगीताची अनुभूती, बासरी, हार्मोनियम, पखवाज, तबला व कीबोर्ड या वाद्यवृंदांचा झालेला अनोखा मिलाफ, देशभक्तीपर गीतांंनी भारावलेले वातावरण व स्वामी विवेकानंदांच्या रूपात मंचावर आलेल्या कलाकारांचे नाट्य सादरीकरणाने कार्यक्रम सजत गेला. शास्त्रीय संगीतासह आजच्या पिढीला भावणारे सिनेमासंगीत व रॉकबॅण्डचे सादरीकरण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात काव्य अभिनय कला यांचा संगम साधण्याचा प्रयत्न रेशमा सत्यजित यांच्या भरतनाट्यम् व कविता जंग्गम यांनी सादर केलेल्या क थ्थकच्या फ्युजनने झाली. यानंतर मुंबई येथील गायक अभिषेक मारोटकर यांनी शास्त्रीय गायन सादर केले.
वाद्यांची जुगलबंदी सादर करण्यात आली. बासरीवर अरविंद उपाध्ये, हार्मोनियमवर संदीप गुरनुले, पखवाजवर श्रीधर कोरडे, तबल्यावर मनीष नवघरे व कीबोर्डवर अक्षय आचार्य यांनी नव्या फ्युजनचा आनंद प्रेक्षकांना दिला. स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रावर आधारित शुभांगी भडभडे लिखित, अभिजित जोशी दिग्दर्शित, अमित घरत यांचा अभिनय असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे लघुनाट्य सादर करण्यात आले. एस.एस. माडखोलकर यांच्या शिष्यांनी सादर केलेले जयोस्तुते या गीतावरील नृत्याने प्रेक्षकांची दाद मिळविली. अभिजित मसराम, श्रीनिधी घटाटे व अभिषेक मारोटकर यांनी मराठी-हिंदी गीते सादर केली.
रॉक बॅण्डचे सादरीकरण तरुणाईला थक्क करणारे ठरले. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन अभिजित जोशी यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर व आसावरी गलांडे यांनी केले. कार्यक्रमाला नृत्यांगना माया जाधव व एस.एस. माडखोलकर राष्ट्र निर्माण संघटनेचे प्रमुख विजय मारोडकर, प्रशांत भारती, नीलेश मारोडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The unique combination of music, dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.