आस्था, परंपरा व देशभक्तीचा अद्वितीय संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:46 AM2017-09-29T01:46:43+5:302017-09-29T01:46:59+5:30
लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त नवरात्रोत्सवावर संकल्प प्रस्तुत धमाल दांडियामध्ये माँ अंबेच्या आराधनेत उत्साह व जोश भरलेल्या युवकांची पावले न थांबता, न थकता थिरकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त नवरात्रोत्सवावर संकल्प प्रस्तुत धमाल दांडियामध्ये माँ अंबेच्या आराधनेत उत्साह व जोश भरलेल्या युवकांची पावले न थांबता, न थकता थिरकली. बुधवारी कामठी रोड रनाळा स्थित कॅनाल गार्डन लॉनमध्ये हा आस्था, परंपरा व देशभक्तीचा अद्वितीय संगम पहायला मिळाला.
धमाल दांडियाला घेऊन युवकांमध्ये मोठा उत्साह होता. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’या संकल्पनेवर गरबा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, संकल्पचे अध्यक्ष विपिन कामदार, संचालक तृप्ती कामदार, विरल कोठारी, विपिन वखारिया, भारत पारेख, राजूभाई वखारिया, राजूभाई कामदार, नीता कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.
धमाल दांडियामध्ये परंपरागत वेशभूषेत आलेल्या युवकांनी देशभक्तीची ओळख देत संपूर्ण वातावरण देशभक्तिमय केले. कुणी तिरंगा घेऊन तर कुणी तिरंगी रंग परिधान करून आले होते. ‘लोकमत’च्या सहकार्याने होत असलेल्या या धमाल दांडियात युवकांसोबतच लहान मुलांचा उत्साह नजरेत भरुन येत होता. रात्री उशिरापर्यंत पारंपरिक गरबा गीतांवर प्रत्येक जण थिरकत होते.
विशेष पुरस्काराने वाढविला उत्साह
बुधवारी धमाल दांडियामध्ये पारंपरिक व संकल्पनेवर आधारित वेशभूषेत सहभागी झालेल्या समूहासाठी विशेष पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार नव गुजरात रास गरबा समूह व चिल्लम चिल्ली ग्रुप यांनी प्राप्त केला. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.